रेकीकरुन कापूस व्यापाऱ्याला लुटणारे चौघे जबरीचोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 22:05 IST2020-12-12T22:05:03+5:302020-12-12T22:05:30+5:30
एलसीबी : तामसवाडीजवळील थरार, १४ लाख १२ हजाराचा मुद्देमाल जप्त

रेकीकरुन कापूस व्यापाऱ्याला लुटणारे चौघे जबरीचोर गजाआड
धुळे : कापूस विक्री केल्यानंतर आलेले १३ लाख ५४ हजार रुपये दुचाकीवरुन एकटे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे जात असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून खाली पाडून पैशांची जबरी चोरी करणाऱ्या चौघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे मुसक्या आवळल्या. चौकशीअंती त्यांनी रेकी करुन हे कारस्थान केल्याचे मान्य केले. ही घटना ९ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील संदिप शिवाजी पाटील हे कपाशीचे व्यापारी आहेत. धुळ्यात त्यांनी आपला कापूस विक्री केल्यानंतर १३ लाख ५४ हजार रुपये घेऊन एकटेच ९ डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास मांडळ या त्यांच्या गावी निघाले होते. धुळे तालुक्यातील कौठळ - तामसवाडी रोडवर त्यांच्या दुचाकीला लाथ मारुन त्यांना खाली पाडण्यात आले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम तिघांनी बरजबरीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९२ जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
सोनगीर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा समांतर तपास सुरु असतानाच धुळ्यातील गल्ली नंबर ५ मधील चड्डा उर्फ देवेंद्र पांडूरंग गायकवाड याच्या सांगण्यावरुन तिघांनी हे कारस्थान केल्याचे समोर आले. सुरुवातीला चड्डा उर्फ देवेंद्र याला ताब्यात घेवून त्याची चौकशी करण्यात आली. जबरी चोरी करणारे त्याचे साथीदार राहुल दिलीप परदेशी (रा. गल्ली नंबर ६, चैनी रोड, धुळे), आकाश एकनाथ दाभाडे (रा. पश्चिम हुडको, पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) आणि अभिजीत भरतसिंग राजपूत (रा. मळाणे ता. धुळे) या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी रेकी कशी केली, लूट करीत पैसे कसे लंपास केले याची माहिती पोलिसांना देत गुन्ह्याचीही कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील १३ लाख ३२ हजार रुपये, ८० हजाराचा दोन दुचाकी असा १४ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.