एकाच अपार्टमेंटमधील चार घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 22:17 IST2019-11-09T22:16:51+5:302019-11-09T22:17:17+5:30
पांडव प्लाझा । सशस्त्र चोरट्यांचा पांडव प्लाझात उच्छाद, चाकूसह टॅमीचा धाकाने भीती

एकाच अपार्टमेंटमधील चार घरे फोडली
धुळे : शहरातील ८० फुटी रोडवरील पांडव प्लाझात चोरट्यांनी हातसफाई करीत ४ घरांना लक्ष केले़ हजारोंचा ऐवज लंपास करीत ज्वेलरी शॉपही फोडण्याचा प्रयत्न केला़ आठवड्यापासून चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे़ दरम्यान, पळून जाताना एका तरुणाला चाकूचा धाक दाखविल्यामुळे तरुणाच्या मनात भीती निर्माण झाली आहे़
८० फुटी रोडवर पांडव प्लाझा आहे़ यात बी-९ वींग मध्ये राहणारे शैलेश शामकुमार गौड हे दिवाळी निमित्त मुंबईला आणि त्यांची पत्नी माहेरी गेली होती़ बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडीकोंडा कापला़ घरात शोधाशोध करुन १० हजाराची रोकड, ७ ग्रॅम सोने असा ऐवज चोरुन नेला आहे़
पांडव प्लाझाच्या ए व्हींगच्या ४ नंबर प्लॅटमध्ये राहणारे मनीष डिगंबर लुणावत यांच्या घरात चोरट्याने हातसफाई केली़ त्यानंतर ए-६ मध्ये राहणारे महेश मालपाणी हे गेल्या पाच दिवसांपासून राजस्थान येथे देवदर्शनासाठी गेले होते़ त्यांचे बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले़ त्यानंतर हिरे मेडीकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ़ अमरसिंह हजारी हे पांडव प्लाझाच्या ए-५ मध्ये राहतात़ ते बाहेरगावी असताना त्यांचे बंद घर फोडून एक तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ५० हजाराची रोकड, घड्याळ असा ऐवज चोरट्यांनी लांबविला़ तर, शैलेश गौड यांचे घर फोडणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत़
पांडव प्लाझाची मोहीम फत्ते केल्यानंतर चोरटे हे दसेरा मैदानने सिध्दी विनायक अपार्टमेंटकडे आले़ तेथे राहणारे दिलीप पाटील यांचे घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला़ पाटील हे पुण्याला गेले असल्याचे समोर आले आहे़ दिलीप पाटील यांच्या घरासमोरच सुरेश अग्रवाल यांचा प्लॅट आहे़ अग्रवाल आणि त्यांचा मुलगा आशिष हे दोघे सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडत असतानाच चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला़ आशिषने दरवाजाबाहेर पाऊल टाकताच एका चोरट्याने त्याच्या पोटाला चाकू लावला़ ‘चूप बैठ’ असा दमही भरला़ प्रसंगावधान राखत आशिष मागे सरकत असतानाच एका चोरट्याने त्याच्यावर टॉमीने वार केला़ मात्र, तो आशिषने चुकविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ लागलीच आशिषच्या वडीलांनी दरवाजा बंद केला आणि आरडाओरड सुरु केला़ आवाज ऐकून आणि होणारी गर्दी लक्षात घेता चोरट्यांनी धूम ठोकली़
चोरटे पळाले कारने
मालेगाव रोडवरील पांडव प्लाझा येथे चोरट्यांनी हातसफाई केल्यानंतर एका कारमधून आलेल्या या चोरट्यांनी पळून जाण्यासाठी त्याच कारचा उपयोग केला़ पुढे ही कार चितोड नाका भागात सोडून चोरट्यांनी पलायन केले़ पोलिसांच्या प्राथमिक तपासातून ही बाब समोर आली असून ती कार पोलिसांनी जप्त केलेली आहे़
ज्वेलर्स दुकान फोडण्याचाही प्रयत्न
गजानन टी हाऊससमोर असलेले ओम जगदीश ज्वेलर्स नावाचे दुकान चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला़ दोन चोरटे याठिकाणी दुचाकीवरुन आले़ त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फोडून शटर उचकाविले़ मात्र, शटरच्या आतील ग्रीपचा दरवाजा त्यांना फोडता आला नाही़ परिणामी काहीच चोरीला गेलेले नाही़