Former Minister GS Chowdhury passes away | माजी मंत्री गो.शि.चौधरी यांचे निधन

माजी मंत्री गो.शि.चौधरी यांचे निधन

पिंपळनेर : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व बल्हाणे येथील दीनदयाळ आदिवासी सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन गोविंद शिवराम चौधरी (वय ८० वर्ष) यांचे शुक्रवारी दुपारी २ वाजता  वृद्धापकाळाने   धुळे येथील निवासस्थानी निधन झाले.   साक्री तालुक्यातील धोंगडे दिगर येथे आदिवासी आश्रम शाळेत शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
गोविंद शिवराम चौधरी यांचा जन्म  साक्री तालुक्यातील  धोंगडे दिगर येथे १८ जुलै १९३९ रोजी झाला.  त्यांनी एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे फ्रुड सप्लाय इन्स्पेक्टर म्हणून  नोकरी केली.  १९७२ साली ते नोकरी सोडून राजकारणात उतरले आणि त्यांनी कासारे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत ते विजयी होऊन  कै. व्यंकटराव रणधीर यांच्या जिल्हापरिषद अध्यक्षतेखाली ते शिक्षण सभापती झाले. १९८५ साली  गोविंद शिवराम चौधरी हे भारतीय जनता पार्टी पक्षातून साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. ते सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून गेले. त्यांनी सन १९९४ पासून साडे तीन वर्ष भाजप- सेना युतीच्या शासनात आदिवासी विकास मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली  व एक मुलगा असा परिवार आहे. त्यापैकी चार मुली एमबीबीएस डॉक्टर आहेत तर मुलगा उदय चौधरी राजकारणात वडिलांचा वारसा पुढे चालवत आहे.

Web Title: Former Minister GS Chowdhury passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.