माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शिरपुरात भाजप, राष्ट्रवादी कार्यालयांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST2021-09-19T04:36:57+5:302021-09-19T04:36:57+5:30
भाजप कार्यालयाचे उद्घाटन दि. १८ रोजी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शिरपुरात भाजप, राष्ट्रवादी कार्यालयांचे उद्घाटन
भाजप कार्यालयाचे उद्घाटन
दि. १८ रोजी शहरात विविध कार्यक्रमांनिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले असताना त्यांच्या हस्ते शहरातील करवंद नाक्याजवळील आऱ. सी़ पटेल कॅम्पसमध्ये असलेल्या भाजप आमदार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले़
यावेळी माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, विलेपार्ले केळवाणी मंडळाचे जॉइंट प्रेसिडेंट भूपेशभाई पटेल, व्हाइस प्रेसिडेंट चिंतनभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, के़ डी़ पाटील, नितीन गिरासे, नारायणसिंग चौधरी तसेच भाजप पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़
आमदारांना दिला सन्मान
आमदार काशीराम पावरा यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयातील मुख्य खुर्चीवर बसण्याचा मान आमदार पावरा यांना फडणवीस यांनी दिला़ त्यामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार राजेश पाडवी हे खुर्चीच्या आजूबाजूला उभे होते़
राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन
दि. १८ रोजी राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील दौऱ्यावर आले असताना त्यांच्या हस्ते करवंद नाका परिसरात राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले़ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग व व्यापार आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस दिनेश मोरे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश गरुड, तालुकाध्यक्ष शिरीष पाटील, ॲड. अमित जैन, माजी तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, प्रशांत पाटील, युवक राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष धीरज सोनवणे, डॉ़ राहुल साळुंखे, वाजीद शेख, प्रशांत पाटील, प्रशांत वाघ, जाकीर शेख, आदी उपस्थित होते़
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरात मोठ्या प्रमाणावर गटबाजी असल्याचे पुन्हा कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी जाणवले़ या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर शहराध्यक्ष डॉ़ मनोज महाजन यांनी झळकावले़ मात्र त्यांनी शहरातील एकमेव पक्षाच्या ऐनवेळी घेतलेल्या कार्यक्रमात दांडी मारल्याची चर्चा दिवसभर सुरू होती़ सदर कार्यालय पक्षाच्या एकाच गटाचे असल्याचे सांगितले जात आहे़ याप्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे नवीन कार्यालयात बसल्यानंतर त्यांच्या कानांत पक्षाचे विविध पदाधिकारी कानाफुसी करताना दिसून आले़ त्यामुळे ते नेमके काय सांगत होते याची चर्चासुद्धा ते गेल्यानंतर रंगली़
फीत कापल्यानंतर वेळात वेळ काढून जयवंतराव पाटील यांनी पक्षाच्या नवीन कार्यालयाच्या चारीही बाजूंना फिरून कार्यालय न्याहाळले़ त्यानंतर ते पुढील नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने रवाना झाले. मात्र ते पक्षाला की एका गटाला स्फूर्ती देऊन गेले हे येणाऱ्या निवडणूक काळातच स्पष्ट होईल़ कार्यालयाच्या उद्घाटनपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी शहराध्यक्ष डॉ़ मनोज महाजन यांच्या आदर्श नगरातील निवासस्थानी जाऊन चहापाण्याचा कार्यक्रम झाला़ अमृता महाजन व डॉ़ मनोज महाजन यांनी त्यांचे स्वागत केले़ याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़