कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील दहा जणांचीही चाचणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST2021-04-02T04:38:01+5:302021-04-02T04:38:01+5:30

धुळे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र ...

Forgetting contact tracing; Not even ten people in positive contact have been tested | कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील दहा जणांचीही चाचणी नाही

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा विसर; पॉझिटिव्हच्या संपर्कातील दहा जणांचीही चाचणी नाही

धुळे - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. दररोज सरासरी ५०० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र एका बाधित रुग्णांच्या संपर्कातील दहा जणांचीही चाचणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग करणे गरजेचे आहे. काँटॅक्ट ट्रेसिंग करून कोरोना बाधित रुग्णाच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक आहे. एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० व्यक्तींची चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र आरोग्य प्रशासनाला काँटॅक्ट ट्रेसिंगचा विसर पडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संपर्कातील १० व्यक्तींनीही चाचणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दररोज सरासरी ५०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्याप्रमाणे किमान २० जणांची चाचणी केली तर दररोज १० हजार चाचण्या होणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यात दररोज केवळ दोन हजार ते तीन हजार चाचण्या होत आहेत.

दररोज ५०० पॉझिटिव्ह चाचण्या मात्र दोन हजार लोकांच्याच

१ - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. दररोज ५०० पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र त्या तुलनेत चाचण्यांची संख्या कमीच आहे. दररोज किमान १० हजार चाचण्या होणे अपेक्षित असताना कधी दोन हजार तर कधी तीन हजार चाचण्या होत आहेत.

२- एका बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान २० रुग्णांची चाचणी करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसते.

३ - मागील आठवड्यात २५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत एकूण २१ हजार ६४१ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यात, २७ मार्च रोजी सर्वाधिक ४ हजार ८६० कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर २८ रोजी केवळ १ हजार ३२३ चाचण्या झाल्या आहेत.

हा घ्या पुरावा -

१- कोरोना बाधित रुग्ण आढळल्या नंतर त्याच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करणे गरजेचे आहे. मात्र अनेक रुग्णांच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींची चाचणी होत नाही. मोगलाई परिसरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ती व्यक्ती गृहविलगीकरणात आहे. मात्र त्या व्यक्तीच्या संपर्कातील एकाचीही चाचणी झालेली नाही.

२- आग्रा रोड परिसरातील एका व्यापाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ती व्यक्ती गृह विलगीकरणात होती. त्या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तीची चाचणी करणे तर दूरच ती व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाकडे नव्हती. गृहविलगीकरणात असताना ७ दिवसांनी प्रकृती कशी आहे. याबाबत विचारणा करणारा आरोग्य विभागाचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह येत असल्याने अडचण -

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कुटुंबातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्ती व कुटुंबातील अन्य सदस्यांची चाचणी करीत होतो. मात्र आता पूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह आढळत असल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या वाढते. त्यामुळे काहीशी अडचण येत आहे. मात्र लो रिस्क संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असून चाचण्यांची संख्या वाढणार आहे.

Web Title: Forgetting contact tracing; Not even ten people in positive contact have been tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.