आधार लिंकिंग न झाल्यास धान्यपुरवठा बंद - शासनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST2021-01-14T04:29:49+5:302021-01-14T04:29:49+5:30
शासनाने २२ डिसेंबर, २०२० रोजी खास पत्र जारी केले असून, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ...

आधार लिंकिंग न झाल्यास धान्यपुरवठा बंद - शासनाचा इशारा
शासनाने २२ डिसेंबर, २०२० रोजी खास पत्र जारी केले असून, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी खास मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाइल लिंकिंग करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांना कोठेही जाण्याची आवश्यकता नसून, आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे आधार कार्डची छायांकित प्रत व अंगठा दिल्यास केवायसीद्वारे आधार सिडिंग होणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये २, १७ हजार लाभार्थ्यांचे आधार सिडिंग बाकी असून, ते तातडीने पूर्ण करण्यासाठी खास मोहीम घेण्यात आली आहे. जे लाभार्थी अस्तित्वात नाहीत, सुमारे २-३ महिन्यांपासून धान्याची उचल केलेली नाही, अशा सर्व लाभार्थ्यांचा धान्यपुरवठा बंद करण्याच्या शासनाचा सूचना आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी धुळे जिल्ह्यात करण्यात येत आहे.
या विषयाबाबत सर्व तहसीलदारांनी आपले स्तरावर बैठका घेऊन स्वस्त धान्य दुकानदार यांना माहिती आणि प्रशिक्षण दिलेले आहे, तसेच ११ जानेवारी रोजी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे प्रतिनिधी व पुरवठा अधिकारी/कर्मचारी यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी या कामासाठी सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आहेत. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वत:हून लाभार्थी यांचेशी संपर्क करून हे काम मुदतीत पूर्ण करावयाचे आहे. सदर कामात कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या आहेत.