महानगरातील ८९ धोकादायक इमारतीत पाचशे रहिवाशांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:22+5:302021-06-09T04:44:22+5:30

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार शहरात १०५ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. जुने ...

Five hundred residents live in 89 dangerous buildings in the metropolis | महानगरातील ८९ धोकादायक इमारतीत पाचशे रहिवाशांचे वास्तव्य

महानगरातील ८९ धोकादायक इमारतीत पाचशे रहिवाशांचे वास्तव्य

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार शहरात १०५ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालीन इमारती आहेत. त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत. त्यापैकी बहुतांश धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचा रहिवास आहे. त्यामुळे पावसाळ्यात वादळी वारे व मुसळधार पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळल्यास वित्त व जीवितहानीदेखील होऊ शकते. दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्याची ‘फॉरमॅलिटी’ मनपाकडून पार पाडली जाते. यंदाही नालेकाठी राहणाऱ्या नागरिकांना व धोकादायक इमारतींना जाहीर नोटीसद्वारे सूचित करण्यात आले आहे. काही इमारतधारकांकडून पावसाळयात इमारतींचे संरक्षण करण्यासाठी ताडपत्री व प्लास्टिकचे आच्छादन केले जाते. दरम्यान जोरदार पाऊस झाल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

धोकादायक इमारतींवर कारवाई करावयाची झाल्यास नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने संभाव्य वाद लक्षात घेऊन मनपा प्रशासन त्याकडे डोळेझाक करते. त्याचप्रमाणे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते इमारत सोडण्यास तयार नसतात तर बहुतांश इमारतींचे वादविवाद न्यायप्रविष्ट असल्याने पालिका त्यावर कारवाई करण्यास धजावत नाही. काही इमारती पडीत असल्या तरी त्या कोसळल्यास आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

वारंवार दिल्या नोटिसा

धोकादायक इमारतींना मनपाकडून दरवर्षी अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४ (१) नुसार नोटिसा बजावणे क्रमप्राप्त आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर धोकादायक इमारतीच्या मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते मनपाला सादर केले पाहिजे. त्यावर मनपाकडून पुढील कार्यवाही केली जाऊ शकते.

Web Title: Five hundred residents live in 89 dangerous buildings in the metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.