आगीत दोन श्वानांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:48 IST2018-03-24T16:48:03+5:302018-03-24T16:48:03+5:30
कारण गुलदस्त्यात : तहसील कचेरीजवळील घटना

आगीत दोन श्वानांचा होरपळून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तहसील कचेरी लगत असलेल्या भंगार पडलेल्या वाहनांना शनिवारी दुपारी अचानक आग लागली़ या आगीत दोन श्वानांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीवर महापालिकेच्या अग्नीशमन बंबाने नियंत्रण मिळविले. सुदैवाने शासकीय कागदपत्रे सुरक्षित असल्याची तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, या आगीचे कारण गुलदस्त्यात आहे.
शहरातील तहसील कचेरीचे आवार मोठे होते. पूर्वी याठिकाणी धुळे तालुका पोलीस स्टेशनची इमारत होती. मध्यंतरी तहसील कचेरीची इमारत नव्याने बांधण्यात आल्यामुळे पोलिस स्टेशनला लागून भिंत घालण्यात आली. या कुंपण भिंतीलगत प्रशासनाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या जुनाट चार चाकी वाहने पडून होती. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यातून धूर निघत असल्याचे लक्षात आले़ तपासणी केली असता आग लागल्याचे लक्षात आले. तत्काळ याबाबत महापालिकेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले़ तातडीने बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली़
शासकीय कागदपत्र सुरक्षित
तहसील कचेरी आणि धुळे तालुका पोलीस स्टेशनचा आवार असल्यामुळे दोनही ठिकाणी शासकीय कागदपत्रे आहेत़ ही आग तातडीने आटोक्यात आणण्यात आल्यामुळे शासकीय कागदपत्रांना धोका पोहचला नाही़