गोदामासह किराणा दुकानाला आग, हजारोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:35 IST2021-04-06T04:35:26+5:302021-04-06T04:35:26+5:30
धुळ्यातील घटना शहरातील वडजाई रोडवर अलहेरा स्कूलजवळ रोशन हाजी यांचे परवीन गादी सेंटरचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये कापूस आणि ...

गोदामासह किराणा दुकानाला आग, हजारोंचे नुकसान
धुळ्यातील घटना
शहरातील वडजाई रोडवर अलहेरा स्कूलजवळ रोशन हाजी यांचे परवीन गादी सेंटरचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये कापूस आणि प्लॅस्टिकचे दाणे, खुर्ची आणि अन्य काही साहित्य ठेवलेले होते. हे सर्व जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोण हे वरपर्यंत येत होते. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे वृत्त कळताच महापालिकेच्या अग्निशमन बंबाने सहा फेऱ्या मारून आगीवर नियंत्रण मिळविले. चाळीसगाव रोड पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़
पिंपळनेरमधील घटना
पिंपळनेर येथील आदर्श कॉलनीमधील साईबाबा मंदिरासमोरील योगेश धरमदास मराठे यांचे श्रद्धा किराणा व जनरल स्टोअर्स आहे. या दुकानात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याने आगीचे व धुळीचे लोण बाहेर येत असल्याचे घरमालक मनोज बिरारीस व नागरिकांच्या लक्षात आले. दुकान मालक मराठे हे बाहेरगावी गेले असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिकांनी दुकानाचे कुलूप तोडून बोरिंग सुरू करून आग आटोक्यात आणली. आग विझविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. या आगीत किराणा मालाचे हजारोंचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही़