महाविद्यालयीन तरुणांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:31+5:302021-06-28T04:24:31+5:30
धुळे : येथील सारा फाउंडेशनतर्फे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविवारी अग्निशमक दलाच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. ...

महाविद्यालयीन तरुणांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण
धुळे : येथील सारा फाउंडेशनतर्फे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर रविवारी अग्निशमक दलाच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी अग्निशामक दलाची कार्यपद्धती समजून घेतली. सहायक अग्निशमन अधिकारी तुषार ढाके यांनी पोलीस मुख्यालय मैदानात सुमारे दीड तासांचे प्रशिक्षण दिले. अग्निशामक दलाची फायर व्हॅन मैदानात आणून संपूर्ण माहिती देण्यात आली. उपकरणाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर मैदानात एक सुरक्षित ठिकाणी आग लावून तिला आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच एखाद्या दुर्घटना स्थळी बचावकार्य कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रशिक्षणात सहभागी मुलांना आग आटोक्यात आणण्याची संधी दिली.
महानगरपालिका आयुक्तांनी या उपक्रमाला परवानगी दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, राखीव पोलीस निरीक्षक रवींद्र बनतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणादरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. हा उपक्रम धुळे शहरासाठी महत्त्वाकांशी ठरेल, असे मत आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले.
सारा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत वाकळे यांनी सांगितले की, अग्निशमन दलाचे कार्य कसे चालते हे जाणून घेण्यासह बचाव कार्याचे प्रात्यक्षिक पाहण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे हा उपक्रम राबविला. सारा फाउंडेशनच्या अध्यक्षांनी आयुक्त अजीज शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, पोलीस निरीक्षक रवींद्र बनतोडे व अग्निशमन दलाचे आभार मानले. तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी सारा फाउंडेशन नक्कीच प्रयत्नशील असेल, अशी ग्वाही यावेळी संकेत वाकळे यांनी दिली.