सांडपाण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 21:25 IST2020-12-13T21:25:31+5:302020-12-13T21:25:57+5:30
दोन वेगवेगळ्या घटना : पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

सांडपाण्याच्या क्षुल्लक कारणावरुन हाणामारी
धुळे : घराचे सांडपाणी रस्त्यावर आल्याच्या क्षुल्लक कारणावरुन दोन वेगवेगळ्या गावांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या त्या पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
धुळे तालुक्यातील तरवाडे गावात एक घटना घडली. घराचे सांडपाणी अंगणात येत असल्याच्या कारणावरुन शाब्दीक वाद झाला. त्याचे पर्यवसान शिवीगाळ करीत हाणमारीत उमटले. जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. ही घटना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विनोद हिरालाल जमादार (४३, रा. तरवाडे ता. धुळे) यांनी १२ डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, राजेंद्र आनंदसिंग जमादार, गोपाळ राजेंद्र जमादार, पप्पू राजेंद्र जमादार (सर्व रा. तरवाडे ता. धुळे) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनार घटनेचा तपास करीत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचानजिक मांडळ गावात दुसरी घटना घडली. अंगणातील सांडपाण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करण्यात आली. यावेळी जीवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली. हा प्रकार १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मांडळ गावात घडला. याप्रकरणी रुखमाबाई संतोष इंदवे (३८, रा. मांडळ, ता. शिंदखेडा) या हातमजुरी करणाऱ्या महिलेने दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, नंदनाबाई रविंद्र पिंपळे (रा. मांडळ ता. शिंदखेडा) या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.