नूर नगरात हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 22:25 IST2021-04-03T22:25:29+5:302021-04-03T22:25:53+5:30
सहा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

नूर नगरात हाणामारी, परस्परविरोधी फिर्याद
धुळे : देवपुरातील नूर नगरात दोन गटांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात परस्पविरोधी फिर्याद दाखल झाल्याने सहाजणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
एका गटाकडून सलमान खान जाफर खान (वय २९, रा. नूर नगर, विटाभट्टी, देवपूर) या भंगार व्यावसायिकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडल्याचा राग आल्याने हाताने बुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास देवपुरातील नूर नगर भागात घडली. याप्रकरणी अर्जुन मोहन लोंढे आणि रोहित अशोक सोनवणे (दोघे रा. नूर नगर, विटाभट्टी, देवपूर) यांच्या विरोधात शनिवारी पहाटे तीन वाजता भादंवि कलम ३२३, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या हाणामारीत सलमान खान जाफर खान हा जखमी झाला असून, त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक आर. जी. माळी घटनेचा तपास करीत आहेत.
दुसऱ्या गटाकडून अर्जुन मोहन लोंढे (२२, रा. नूर नगर, विटाभट्टी, देवपूर, धुळे) या रिक्षाचालकाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत हाताने बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास देवपुरातील जुना आग्रा रोडवरील नूर नगरच्या बोर्डासमोर घडली. याप्रकरणी भुऱ्या शेख, जमील अन्सारी, सलमान पठाण, इलियास शेख (सर्व रा. नूर नगर, देवपूर) यांच्या विरोधात शनिवारी पहाटे सव्वादोन वाजता भादंवि कलम ३२३, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या हाणामारीत अर्जुन मोहन लोंढे, रोहित सोनवणे, गायत्री लोंढे, उषाबाई सोनवणे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एल. एन. पवार करीत आहेत.