बुरशीयुक्त चारा प्रक्रिया करुनच जनावरांना खाऊ घाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:05 IST2019-11-17T12:04:54+5:302019-11-17T12:05:40+5:30
संडे अँकर । अवकाळी पावसामुळे कडब्यावर ‘अॅस्परजिलस नायगर’ बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

Dhule
न्याहळोद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, ज्वारी, सोयाबीन सारख्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे या पिकांच्या कडब्यावर ‘अॅस्परजिलस नायगर’ बुरशीची मोठया प्रमाणावर वाढ होते. अशा प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ‘आॅक्झॅलीक अॅसीड’चे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे बोंडाच्या फुलाचे, फुल गवतामध्ये सुद्धा ‘अॅक्झालिक अॅसीड’चे अठरा टक्के प्रमाण जास्त असते. जनावरांना अशा प्रकारचा चारा खाऊ घातल्यास जनावरांच्या रक्तातील कॅल्शियम बरोबर संयोग होऊन कॅल्शियम आॅक्झॅलेटचे स्फटीक तयार होतात, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन महत्वाचे अवयवाचे कार्य मंदावते किंवा थांबते व जनावरांचा मृत्यु होतो. विषबाधा ही गायी, म्हशी, शेळ्या व मेंढया इत्यादी जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.
बुरशीयुक्त चारा खाल्याने बाधीत झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात- सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे १ ते १२ महिने सतत बुरशीयुक्त चाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आढळून येऊन जनावरांमध्ये भुक मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे तसेच लाळ गळणे, जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासोच्छवास घेण्यासाठी त्रास होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात, लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे, जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे, बध्दकोष्टता हीे लक्षणे तीव्र विषबाधेची लक्षणे दिसतात. व यामध्ये जनावरे दगावूसुध्दा शकतात.
तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या चाºयावर चुन्याची निवळी शिंपडून वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा. तसेच जनावरांना बाधा झाल्यास पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधावा.
अवकाळी पावसाचा गुरांनाही फटका
जिल्ह्यात सततच्या परतीच्या पावसामुळे मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे विविध पिकांच्या कडब्यावर बुरशीजन्य रोग पसरल्याने गुरांसाठी चाºयाची कुठून तजवीज करावी, अशी चिंता पशुपालकांना सतावत आहे. एकंदरीत बळीराजा दुहेरी संकटात सापडला असून शासनाकडून मदतीची प्रतीक्षा लागून आहे.