शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:24 IST2021-06-19T04:24:18+5:302021-06-19T04:24:18+5:30

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी ...

Farmers tend to cultivate cotton | शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच कल

शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडेच कल

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५४८.४० मिलीमीटर एवढे आहे. जिल्ह्यात ४ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होत असते. मात्र गेल्या दोन वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे बागायती पिके लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वात जास्त कल असतो. जिल्ह्यात गेल्या सात वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झालेली दिसून येते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८८ हजार हेक्टर ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर १६-१७ या वर्षात ७५०० हेक्टरने वाढ होत १ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यानंतर १७-१८ या वर्षात ९४०० हेक्टरने वाढ होत २ लाख ५ हजार ३८३ हेक्टरपर्यंत लागवड करण्यात आली. २०१८-१९ मध्ये २ लाख ३२ हजार ७००, २०१९-२० मध्ये २ लाख २४ हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली होती. दरम्यान २०२०-२१ मध्ये तब्बल १५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात वाढ होत, २ लाख ४० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली होती. ही आतापर्यंत सर्वात जास्त कपाशीची लागवड असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०२१-२२ मध्ये २ लाख २३ हजारचे उद्दिष्ट

यावर्षीही शेतकऱ्यांचे कापूस लागवडीलाच प्राधान्य असून, कृषी विभागातर्फे २ लाख २३ हजाराचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत असल्याने, कपाशीचे क्षेत्र वाढत चालले आहे.

भाताची लागवड कमी

धुळे जिल्ह्यातील माळमाथा परिसरात भाताची लागवड करण्यात येत असते. दोन वर्षात दमदार पाऊस झाल्याने,भाताची लागवडीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र २०१९-२० मध्ये ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. तर २०२०-२१ मध्ये २२०० हेक्टरने भाताचे क्षेत्र कमी होत ४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड झालेली होती. तर २०२१-२२ मध्ये अजून १०० हेक्टर क्षेत्र कमी झालेले असून, यावर्षी फक्त ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

गेल्या काही वर्षात कापसाची अनेक वाण विकसित झालेले आहेत. त्यामुळे एकरी उत्पादन वाढले आहे. तसेच आपल्याकडील जमीनही कपाशी पिकाला पोषक आहे. कापूस विक्रीतून चांगली रक्कम शेतकऱ्याला मिळत असते. आदी गोष्टींमुळे जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र वाढत आहेत.

- डॉ. दिनेश नांद्रे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी केंद्र,धुळे

गेल्या काही वर्षात कपाशीवर पडलेल्या रोगराईमुळे कापूस लागवड परवडत नाही. मात्र इतर पिके खर्चाच्या मानाने परवडत नाही. कोरडवाहू क्षेत्रातही कापसाचे चांगले उत्पन्न येते. कापूस विक्रीतून एकठोक रक्कम मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्याय उपलब्ध नसल्याने, कपाशीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे.

- ॲड. प्रकाश पाटील,

कृषिभूषण,पढावद

Web Title: Farmers tend to cultivate cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.