बोंडअळीपासून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:45+5:302021-05-03T04:30:45+5:30
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ...

बोंडअळीपासून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले, खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. हवामान
विभागाने पाऊस चांगला होईल, असा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी-बियाण्याचा तुटवडा जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बोगस बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्राम कृषी विकास समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये कपाशीवरील बोंडअळी निर्मूलन, कीटकनाशकांची अवाजवी फवारणी टाळण्यासाठी जनजागृती करावी. खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँकांसह खासगी बँकांनी वेळेत शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करावा. त्याचा जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घ्यावा. एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हाधिकारी संजय यादव म्हणाले, की धुळे जिल्ह्यासाठी पीक कर्जाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी ६८४.९९ कोटी रुपयांचे, तर रब्बी हंगामासाठी ७७.०१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे नियोजन आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले, की यंदाच्या खरीप हंगामात ४ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीसह विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन आहे. बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बी-बियाणे, खतांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. कपाशीवरील बोंड अळीच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी सोनवणे यांनी ‘एक गाव-एक वाण’, ‘विकेल ते पिकेल अभियान’, भेंडी उत्पादन, ज्वारी उत्पादनाविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष रंधे, आमदार गावीत यांनी विविध सूचना केल्या.