ट्रॅक्टरद्वारे झटपट पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:21 IST2019-11-20T23:21:03+5:302019-11-20T23:21:40+5:30
बैलजोडी व मजूर टंचाई : रब्बी हंगामाचे शेतकऱ्यांना वेध; ज्वारी, गहू, हरभरा पेरणीस सुरुवात

Dhule
कापडणे : परतीचा पाऊस गेल्याने आता शेतकरी रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. सततच्या चार वर्षापासून कोरडा व यंदाच्या अवकाळी पावसामुळे चारा टंचाई, मजूर टंचाईमुळे बैलजोडी ठेवणे शेतकºयांना परवडत नसल्याने कमी वेळात जास्त क्षेत्रफळात पिक पेरा करण्यासाठी बैलजोडी व मुजरांऐवजी अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करताना दिसून येत आहेत.
कोरडवाहू रब्बी ज्वारी १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत पेरणी केली जात असते. मात्र सततच्या परतीच्या पावसाने खोळंबा घातल्याने रब्बी हंगामातील पिक पेरणी उशीरा घेतले जात आहे. सध्या ज्वारी पेरणीसही सुरुवात झालेली आहे. या पाठोपाठ हरभरा, मका, दादर, कांदा, पालेभाज्या आदी खरीप हंगामातील पिकांची पेरणी व लावणीस सुरुवात झालेली आहे.
कापडणे गावासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या गव्हाची पेरणी जोरात सुरू आहे. सलग तीन महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच शेत जमिनीत अजूनही मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. त्यामुळे मजूर व बैलजोडीच्या सहाय्याने शेती तयार करून रब्बी पीक पेरणीसाठी अडचण येत आहे.
त्यासाठी झटपट रब्बी हंगामातील पीक पेरणी उरकण्यासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकरी गव्हाची पेरणी करताना दिसत आहे. एक बिघा पेरणीसाठी ट्रॅक्टर मालकाला सहाशे रुपये देऊन गव्हाची व खताची सोबत पेरणीचे काम केले जात आहे.
खरीप हंगामातील कपाशीचे क्षेत्र जास्त असल्याने रब्बीचे क्षेत्र त्यात गुंतले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकºयांच्या शेती पिकांची नासधूस झाली आहे. यामुळे उत्पादित धान्य व चारा खराब झाला आहे. खरिपातील कोणतेही पीक हाती न येण्याची शाश्वती असल्याने बºयाच शेतकºयांनी खराब झालेली कपाशी पिकासह अन्य पिके उपटून फेकली आहेत व त्या रिकाम्या झालेल्या शेतात आता रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी करताना शेतकरी दिसत आहेत.
सलग तीन महिन्यापर्यंत झालेल्या पावसामुळे व परतीच्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने जमिनीच्या पाण्याची पातळी जास्त वाढली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पिक पेरा मोठ्या प्रमाणात असणार आहे, यामध्ये मुख्यत्वे गहू, हरभरा, मका, खोंडे, ज्वारी आदी पिके मोठ्या प्रमाणावर असणार आहेत.