अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST2021-02-17T04:42:50+5:302021-02-17T04:42:50+5:30

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. ...

The farmer panicked at the prospect of untimely | अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला

अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला

गेल्यावर्षी झालेला दमदार पाऊस, गारपीट, आदीमुळे खरीप हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्याच्या हाती फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघू शकला नाही. त्यातच लॅाकडाऊनचाही शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली. मुबलक पाऊस झाल्यामुळे यावर्षी रब्बीच्या गहू, हरभऱ्याची लागवड वाढली होती. पिके चांगलीच बहरली असून, अशीच स्थिती राहिली तर खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघेल, अशी शेतकऱ्यांनी अपेक्षा आहे.

असे असतानाच हवामान खात्याने १६ ते १८ फेब्रुवारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल अशी शक्यता गृहीत धरण्यात येत आहे.

गहू काढणीवर भर

परिसरातील नगाव, तिसगाव ढंडाने, वडेल, देवभाने, सायणे, धमाणे परिसरात हजारो एकरवर गहू पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. काढणीसाठी आलेला गहू हा ९० ते १०० दिवसांनंतर उपयुक्त असतो, तो मात्र ८० ते ८५ दिवसांतच काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकरी येईल त्या संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच क्षेत्रावर गहू, बाजरी, कांदा, ज्वारी, हरभरा, मिरची, टरबूज, पपई अशी खर्चिक पिके आहेत, त्यापैकी कच्चा, पक्का झालेला गहू मात्र काढून घेण्यास पसंती देत आहेत. एकरी १० ते १४ पोते येणारे पीक मात्र सध्या ७ ते ८ पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. दरम्यान, अशीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांना खरिपाप्रमाणे रब्बीतही नुकसान साेसावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट टळावे, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.

Web Title: The farmer panicked at the prospect of untimely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.