मिळकत हडपण्यासाठी वक्फ बोर्डाच्या नावाचे बनावट दस्ताऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 22:11 IST2021-01-02T22:11:28+5:302021-01-02T22:11:48+5:30
दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल

मिळकत हडपण्यासाठी वक्फ बोर्डाच्या नावाचे बनावट दस्ताऐवज
धुळे : जीवंत व्यक्तीला मयत दाखवून ट्रस्टची मिळकत हडप करण्यासाठी वक्फ बोर्डाच्या नावाने बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा हा प्रकार ६ एप्रिल २०१४ पासून आजपावेतो सुरु होता.
मोलवीवाडा मशिद ट्रस्टी नियाज अहमदयार मोहम्मद मौलवी (७५, रा. अकबर चौक, मौलवीवाडा, धुळे) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, एकबाल अहमदयाद मोहम्मद रज्जाक (रा. कसाबवाडा मशिदजवळ, धुळे) आणि रईस शाह साबीर शाह या दोघांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नियाज अहमदयाद मोहम्मद मौलवी हे जीवंत असून देखील त्यांना मयत दाखविले. ट्रस्टीची मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने दोघांनी कट कारस्थान रचून खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन स्वत:ला ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून वक्फ बोर्डाच्या नावाचे बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक केली. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच आझादनगर पोलीस ठाण्यात मोलवीवाडा मशिद ट्रस्टी नियाज अहमदयार मोहम्मद मौलवी यांनी १ जानेवारी रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७२, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. पाटील घटनेचा तपास करीत आहेत.