समोरा-समोर लढतींमुळे निर्माण झाली चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:33 IST2021-01-13T05:33:42+5:302021-01-13T05:33:42+5:30
श्रीदत्तवायपूर गावात तीन वॉर्डांच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. अर्ज माघारीपर्यंत वॉर्ड क्रमांक ३ मधील एक जागा ...

समोरा-समोर लढतींमुळे निर्माण झाली चुरस
श्रीदत्तवायपूर गावात तीन वॉर्डांच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. अर्ज माघारीपर्यंत वॉर्ड क्रमांक ३ मधील एक जागा बिनविरोध झाली. आता ८ जागांसाठी २१ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होत आहे. भाजपच्या पॅनलचे नेतृत्व दत्तात्रय बाबुलाल पाटील तर काँग्रेसच्या पॅनलचे नेतृत्व शिवाजी पाटील व योगेश पाटील हे करीत आहेत. सरळ-सरळ लढत असल्याने, या ठिकाणीही चुरशीचा सामना बघायला मिळतो आहे.
तालुक्यातील खलाणे ग्रामपंचायत निवडणुकीतही प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. पाच वॉर्डांतील १३ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र एक जागा बिनविरोध झालेली असून, आता १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. येथे विकास पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल यांच्यातच सामना आहे. विकास पॅनलचे नेतृत्व माजी पोलीस पाटील भगवान पाटील व व रमेश टाटीया हे करीत आहेत. तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी दोन अपक्ष उमेदवारही आपले भाग्य अजमावत आहेत. दहा वर्षांपूर्वी या गावाची निवडणूक बिनविरोध झालेली होती. या वेळीही गावाच्या एकोप्यासाठी निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न झाले होते. मात्र काही कारणास्तव निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. गेल्या वेळी या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत विकास पॅनलने सत्ता मिळविली होती. त्यापेक्षा अधिक चुरस या वेळच्या निवडणुकीत बघावयास मिळत आहे. त्यामुळे येथील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
डांगुर्णे-सोंडले या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. अर्ज माघारीपूर्वी या ठिकाणच्या तीन जागा बिनविरोध झालेल्या असून, त्यात डांगुर्णेची एक व सोंडल्याच्या दोन जागांचा समावेश आहे.
चिमठावळ येथेही भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सात जागा असून, १४ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. या ठिकाणी एकही जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. गेल्या वेळी या ठिकाणी भाजपची सत्ता होती. या ठिकाणी दोन पॅनलमध्ये समोरासमोर लढत असल्याने, निवडणुकीची रंगत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
अमराळे येथेही ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक होत असून, येथेही भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना बघावयास मिळत आहे. भाजपच्या पॅनलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सुभाष बोरसे करीत आहेत. तर काँग्रेसच्या पॅनलचे नेतृत्व जयराम जगतराव बोरसे, प्रमोद श्रीराम बोरसे हे करीत आहेत. येथेही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही पॅनलने कंबर कसलेली आहे. मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकून ग्रामपंचायतीची सत्ता सोपवितात याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.
शिंदखेडा तालुक्यात अनेक मोठ्या ग्रामंपचायतींच्या निवडणुका होत असून, त्यादेखील अत्यंत चुरशीच्या होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी व त्यानंतर लागणाऱ्या निकालाकडे अनेकांच्या नजरा आत्तापासूनच लागून राहिलेल्या आहेत.