राजेंद्र शर्मा
धुळे : शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील १ कोटी ८४ धुळे लाखांहून अधिक रकमेच्या प्रकरणात अखेर न्याय दंडाधिकारी ए.बी.चौगुले यांच्या न्यायालयाच्या आदेशान्वये शुक्रवारी रात्री शहर पोलीस स्टेशनला आमदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्विव सहायक किशोर पाटीलसह दोघांविरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.
गुरुवारी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत कुठलाही वकील न लावता माजी आमदार गोटे यांनी स्वतःच युक्तिवाद सादर केला. त्यानंतर, मुख्य न्याय दंडाधिकारी चौगुले यांनी कलम ३०८ (खंडणी), ६१(२) (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न), २३३ (खोटे पुरावेसादर करणे), २३८, २३९ (गुन्ह्याची माहिती लपवणे), २४१ (इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्यास मदत करणे) यांसारख्या गंभीर कलमांखाली दखलपात्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना दिले आहे.
अखेर गुन्हा दाखल : न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीस स्टेशनला शुक्रवारी रात्री कलम ३०८, २३३, २४१ अन्वये संशयित आरोपी किशोर पाटील, राजकुमार मोगले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी दाखल असलेल्या एनसी गुन्हाचा तपास या नवीन गुन्ह्यामध्ये समाविष्ट करुन तपास करण्यात येईल. तपास एसडीपीओ (शहर) राजकुमार उपासे करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.