वाहन परवान्यांची मुदत वाढवली, योग्यता प्रमाणपत्रांनाही मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 22:49 IST2021-04-01T22:48:51+5:302021-04-01T22:49:45+5:30
आरटीओ कार्यालय : चाचणी शीबिरे काेरोनामुळे रद्द

वाहन परवान्यांची मुदत वाढवली, योग्यता प्रमाणपत्रांनाही मुदतवाढ
धुळे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र यांची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. शिवाय वाहन चालक परवाना देण्यासाठीची तालुकास्तरीय शीबिरे रद्द केली आहेत.
रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने जारी केलल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, वाहन नोंदणी कागदपत्रे, तसेच अनुज्ञप्तीची वैधता १ फेब्रुवारीपासून संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ पर्यंत संपणार आहे, अशा कागदपत्रांच्या नूतनीकरणाला लॉकडाऊनमुळे विलंब होत आहे. अशा कागदपत्रांची वैधता ३० जूनपर्यंत वैध आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
संगणकीय ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदणीकृत परिवहन संवर्गातील वाहनाचा थकीत, चालू कर भरण्याची सुविधा परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याद्वारे कराचा भरणा करून वाहनांच्या संचलनास कोणताही अडथळा येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
कोरोनामुळे वर्षभरापासून मुदतवाढ मिळत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तालुकास्तरावरील शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती चाचणीसाठी वार्षिक शिबिर आयोजित करण्यात येते. परंतु, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने १ ते १५ एप्रिल या कालावधीतील अनुज्ञप्ती शिबिर पुढील आदेश होईपर्यंत रद्द करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.