मोबाइलवर बोलणे पडले महागात; ९६ वाहनधारकांचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:25 IST2021-07-02T04:25:04+5:302021-07-02T04:25:04+5:30
धुळे : मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातून काही वेळेस अपघातदेखील घडत असतात. स्वत:सह दुसऱ्याचा जीवदेखील ...

मोबाइलवर बोलणे पडले महागात; ९६ वाहनधारकांचा परवाना निलंबित
धुळे : मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशातून काही वेळेस अपघातदेखील घडत असतात. स्वत:सह दुसऱ्याचा जीवदेखील धोक्यात येत असल्याने शहर वाहतूक शाखेने ही बाब गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात १२७ जणांना मोबाइलवर बोलत वाहन चालविताना पकडण्यात आले. त्यांचा वाहन परवाना जप्त करत तो तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. यापैकी ९६ प्रस्ताव तडकाफडकी निलंबित करण्यात आलेले आहेत.
शहराचा विस्तार वाढताच
धुळे : शहराचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने महापालिकेसह पोलिसांकडूनदेखील खबरदारी घेण्यात येत आहे. लोकसंख्या आणि वाढणारा विस्तार लक्षात घेता स्वतंत्रपणे पोलीस ठाण्याची निर्मिती असली तरी त्यात शहर वाहतूक शाखा स्वतंत्रपणे काम करणारी मजबूत यंत्रणा कार्यरत आहे. वर्दळीच्या चौकांसह गजबजणाऱ्या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी आपली सेवा बजावत असतात. अशावेळी वाहनधारकांची चौकशी करणे, त्यांच्याकडे वाहन परवाना आहे की नाही त्याची तपासणी करत असताना मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांनादेखील पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
वर्दळीच्या चौकात पोलीस
धुळ्यात सध्या शिवतीर्थ चौक, कमलाबाई चौक, कराचीवाला खुंट, प्रकाश टॉकीज चौक, पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाचा चौक, दत्तमंदिर चौक, नगावबारी चौक अशा विविध ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आपली सेवा बजावित आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासोबतच अवैध पार्किंगकडेसुद्धा या विभागाने लक्ष केंद्रित केलेले आहे. अस्ताव्यस्त पार्किंगसुद्धा दंडास पात्र आहे. यासोबतच ट्रिपल सीट, प्रवासी वाहनात जादा प्रवासी बसविणे यासोबतच वन-वे रुट असताना बिनधास्तपणे त्यातून वाहन चालविले जात आहे का याकडेदेखील विभागाचे लक्ष असते. त्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू असते.
१२७ जणांचा निलंबनाचा प्रस्ताव
जानेवारीपासून ते जूनअखेरपर्यंत वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबविली होती. त्यात मोबाइलवरून बोलत वाहन चालविणाऱ्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २०० रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला. शिवाय त्यांचा परवाना हा तीन महिन्यांसाठी निलंबित करावा, असा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला आहे. यात तात्काळ ९६ प्रस्ताव निलंबित झाले असून, उर्वरित कागदपत्रांअभावी प्रलंबित असले तरी सर्वांचा प्रस्ताव मान्य होणार आहे.
परजिल्ह्यातील २४ प्रस्ताव
वाहतूक शाखेने वाहन पकडण्याच्या या विशेष मोहिमेत जिल्ह्यातीलच नाही तर परजिल्ह्यातील वाहनेदेखील कचाट्यात सापडली आहेत. त्यात जळगाव येथील १५, मालेगाव दोन आणि नाशिक जिल्ह्यातील सात असे एकूण २४ वाहनांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे. पर जिल्ह्यातील वाहनधारकांनाही त्याचा फटका सहन करावा लागला आहे.
पुन्हा सापडल्यास कठोर कारवाई
ज्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे, असे वाहनधारक पुन्हा वाहन चालविताना सापडल्यास त्यांच्याकडून ५०० रुपये दंड तर घेतला जाणारच आहेच, शिवाय त्यांचा परवाना कायमस्वरूपी निलंबितदेखील होऊ शकतो.
यांच्यावर सोपविली जबाबदारी
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे. त्यात वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, दिनेश देवरे, दत्तात्रय साळुंखे आणि आरीफ शेख यांचा समावेश आहे.
कोटसाठी
वाहनधारकांनी आपले वाहन चालविताना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. मोबाइलवर बोलत वाहन चालवू नये. वाहन थांबवून बोलून घ्यावे. मोबाइलवर बोलत वाहन चालविताना आढळल्यास त्यांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल.
- संगीता राऊत,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
ग्राफसाठी
महिना कारवाई
जानेवारी ३१
फेब्रुवारी १९
मार्च २८
एप्रिल १२
मे ११
जून २६