शिरपूर : निवडणूकीच्या सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक विभागाचा अधिकारी असणार आहे. एका उमेदवाराला २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा राहील, अशी माहिती शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल यांनी पत्रकार परिषदेत दिली़येथील तहसील कार्यालयात डॉ़विक्रम बांदल यांनी आचारसंहिता संदर्भात मार्गदर्शन केले़ शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास प्रारंभ होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार आबा महाजन, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय़डी. शिंदे, नगरपालिकाचे मुख्याधिकारी अमोल बागुल हे काम पाहणार आहेत.बांदल यांनी विभाग प्रमुख, राजकीय पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे. तालुक्यात ३२९ मतदान केंद्रे असून मतदानासाठी ३२ झोन करण्यात आले असून त्यासाठी ३२ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची तपासणी पूर्ण झालेली आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे. रोखीचे व्यवहार करताना बँकांना तशा आशयाचे पत्र संबंधितांना द्यावे लागेल. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपात दिसल्यास त्याची तपासणी करण्यात येईल. त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. यासाठी मतदारसंघात चार ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. त्यात मध्यप्रदेश सीमेकडील मालकातर, शिंदखेडाकडे गिधाडे, शहादा रस्त्याकडे भटाणे व चोपडाकडे तांडे या चार ठिकाणी आचारसंहिता पालनासाठी तपासणी केंद्रे करण्यात येणार आहेत.निवडणुकीच्या सर्व परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक विभागाचा अधिकारी उपस्थित राहणार असल्याने इच्छूक उमेदवारांची गैरसोय होणार नसल्याचे बांदल म्हणाले. सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पेड न्यूजच्या संदर्भातही निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष राहणार आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर व वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आदर्श मतदान केंद्र्र व महिला मतदान केंद्र्रही असणार आहेत. तालुक्यात १० टक्के मतदान केंद्र्र संवेदनशील असल्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
Vidhan Sabha 2019 : प्रत्येक उमेदवारास २८ लाखाची खर्च मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 14:00 IST