एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:06 IST2021-01-02T12:05:58+5:302021-01-02T12:06:10+5:30
धुळे : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत ...

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया
धुळे : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कितीही वेळा परीक्षा देता येत होती. आता मात्र त्यावर बंधने येणार आहेत. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हवशा नवश्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल असे काही विद्यार्थ्यांनी निर्णयाचे स्वागत करताना सांगितले. तर यामुळे परीक्षा देण्याच्या कमी संधी मिळणार असल्याने काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने परीक्षा प्रक्रिया वेळेत पार पाडावी असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी
आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. यामुळे हौस म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल. आयोगाकडून परीक्षार्थीना संधींची मर्यादा निश्चित करण्यात येत आहे, मात्र आयोगानेही परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
पियुष शिंदे, विद्यार्थी, धुळे