फेरीनिहाय बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:12 IST2019-05-23T22:11:57+5:302019-05-23T22:12:58+5:30
मतमोजणीच्या ठिकाणाचे लाइव्ह चित्रण

dhule
धुळे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे गुरुवारी मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक फेरीनिहाय कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडत गेली. आघाडी वाढत गेल्याने उमेदवार विजयाच्या समीप पोहचल्याची खात्री पटताच त्यांच्याकडून विजयाच्या जल्लोषाचे मनोरथ रचले जाऊ लागले. यानंतर अखेरच्या फेरीनंतर विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला..
पहिल्या फेरीनंतर...
सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीची मते जाहीर झाली त्यावेळी भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी सर्वप्रथम १३ हजारांनी आघाडी घेतली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला तर कॉँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर पुढील
फेरीत काय होते, याची प्रतीक्षा सुरू झाली. फेरीच्या घोषणेला दिरंगाई झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडत होते.
सहाव्या फेरीनंतर...
सकाळी ९.५० वाजता दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीच्या घोषणेत डॉ.भामरे यांची आघाडी दुप्पट म्हणजे २६ हजार ९०० झाली. तर सहाव्या फेरीनंतर ही आघाडी ९५ हजार ९२७ पर्यंत वाढली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. मात्र मतमोजणीस्थळी जल्लोष करता येत नसल्याने ते निकालाच्या प्रतीक्षेत दिसले. मीडिया कक्षात ठेवलेल्या टीव्हीवरील बातम्या ऐकण्यासाठीही त्याची गर्दी होत होती. पोलीस येऊन त्यांना तेथून बाहेर पिटाळत होते. मात्र देशातील निकाल, पक्षाची कामगिरी जाणून घेण्याबाबतही पदाधिकारी, कार्यकर्ते सजग दिसले.
आठव्या फेरीनंतर...
सातव्या फेरीमध्ये डॉ.भामरे यांची आघाडी कमी होऊन ती ३६ हजार ६४९ पर्यंत कमी झाली. तर आठव्या फेरीत ती ११ हजार ७५९ पर्यंत खाली आल्याने भाजपा कार्यकर्त्यांत चलबिचल होऊन चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतरही आघाडीत चढउतार होत राहिला. नंतर मात्र ती वाढतच गेली. त्यामुळे दुपारी दीड वाजता डॉ.सुभाष भामरे मतमोजणीस्थळी पोहचले.
शेवटच्या फेरीनंतर...
अकराव्या फेरीनंतर डॉ.भामरे यांची मतांची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढत राहिली. यावेळी डॉ.भामरे यांना ६ लाख ९ हजार ४८८ तर कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना ३ लाख ८२ हजार ५४३ मते मिळालेली होती. डॉ.भामरे यांची आघाडी २ लाख २६ हजार ९४५ एवढी झाली होती. त्यामुळे विजयाचा विश्वास बळावला. यावेळी रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, प्रदीप कर्पे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मतमोजणीस्थळाबाहेर येऊन जल्लोष केला.