उभंड येथील शौचालय बांधकामात साडेपंधरा लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 22:12 IST2021-02-23T22:12:33+5:302021-02-23T22:12:54+5:30
माजी महिला सरपंचासह विद्यमान सरपंच व ग्रामसेवकाविरोधात गुन्हा

उभंड येथील शौचालय बांधकामात साडेपंधरा लाखांचा अपहार
धुळे : साक्री तालुक्यातील उभंड येथील ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या २९१ वैयक्तिक शौचालयाच्या कामांत केवळ १६३ शौचालयांची कामे करीत उर्वरीत १२८ वैयक्तिक शौचालयांची कामे न करता १५ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जगदीश पांडूरंग खाडे (४८) यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार उभंडचा ग्रामसेवक, माजी महिला सरपंच, विद्यमान सरपंच आणि माजी सरपंचांचा पती अशा चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.
साक्री तालुक्यातील उभंड ग्रामपंचायतीने २०१५ ते ७ जानेवारी २०२१ दरम्यान २९१ वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेतल्याचे दिसते. यात १६३ शौचालयांची कामे झाल्याचे दिसते. मात्र उर्वरीत १२८ शौचालयांची कामे झाल्याचे दिसून येत नाही. शिवाय १० मार्च २०१८ नंतरचे वैयक्तिक शौचालयाचे (एसबीएम) दप्तरही चौकशीसाठी सादर केलेले नाहीत. यामुळे उभंडचे ग्रामसेवक रविंद्र यशवंत पाटील (रा. स्वामी सोसायटी, साक्री) सरपंच नवल धवळू देवरे (रा. उभंड ता. साक्री), तत्कालिन सरपंच विद्याबाई संजय पाटील यांनी १२८ शौचालयांचे काम दाखवून प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे एकूण १५ लाख ३६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. तसेच तत्कालिन सरपंच विद्याबाई पाटील यांचे पती संजय चिंधा पाटील यांच्या नावे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक शौचालयाचे काम मंजूर नसताना त्यांचे नावे १२ हजार रुपयांचा धनादेश वटविला गेल्याचे दिसून येत आहे. संबंधितांनी एकूण १५ लाख ४८ हजार रुपयांचा अपहार केल्याने ग्रामसेवक रविंद्र पाटील, सरपंच नवल देवरे, तत्कालिन सरपंच विद्याबाई पाटील, त्यांचा पती संजय पाटील या चार संशयितांविरुध्द भादंवि कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ घटनेचा तपास करीत आहेत.