काेरोनामुळे पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी खते, बियाणे मोफत देण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:36+5:302021-07-07T04:44:36+5:30

धुळे : कोरोनामुळे पालक गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना खते आणि बियाणे मोफत मिळवून देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. ...

Efforts to provide free fertilizers and seeds for families who have lost their parents due to Carona | काेरोनामुळे पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी खते, बियाणे मोफत देण्यासाठी प्रयत्न

काेरोनामुळे पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी खते, बियाणे मोफत देण्यासाठी प्रयत्न

धुळे : कोरोनामुळे पालक गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना खते आणि बियाणे मोफत मिळवून देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच पालक गमावलेल्या मुलांची शाळेची फी माफ करण्यासाठी संस्थाचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सोमवारी झालेल्या कृती दलाच्या बैठकीत देण्यात आली. अनाथ झालेल्या बालकांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी गठीत जिल्हास्तरीय कृती दलाची जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी मनीष पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, जिल्हा परीविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षणगृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना विषाणूमुळे एकाच कुटुंबातील दोन्ही पालकांचा म्हणजे आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा पालकांच्या निधनामुळे शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालके अनाथ झाली आहेत. या बालकांप्रती प्रत्येकाने संवेदनशील राहणे आवश्यक आहे. या बालकांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. मात्र, या बालकांचे शिक्षण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंतचे आयुष्य सन्मानाने जगता यावे म्हणून ही मदत आर्थिकदृष्ट्या पूरक ठरणार आहे. त्यामुळे अशा पात्र बालकांचा शोध घेऊन त्यांना ही मदत मिळवून द्यावी. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांची पूर्तता करून संबंधितांना लाभ मिळवून द्यावेत. तालुकास्तरावरील कृती दलाच्या बैठका नियमितपणे घेवून पालक गमावलेल्या मुलांशी संपर्क साधावा. तसेच अशा कुटुंबाना मदत मिळवून द्यावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे यांनी सांगितले, पालक गमावलेल्या कुटुंबांसाठी बि-बियाणे, रासायनिक खते मोफत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिक्षणाधिकारी पवार यांनी सांगितले, की कृती दलाच्या आवाहनानंतर काही शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जात आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भदाणे यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या १५ असून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच या मुलांच्या व कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Efforts to provide free fertilizers and seeds for families who have lost their parents due to Carona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.