सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:45 IST2021-04-30T04:45:02+5:302021-04-30T04:45:02+5:30

तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी. पाटील महाविद्यालयातील ...

Ecological balance is essential for the survival of living things | सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन आवश्यक

सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरण संतुलन आवश्यक

तालुक्यातील वेल्हाणे येथे जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेत विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, झेड.बी. पाटील महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांचे ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी वेल्हाणेच्या सरपंच शीतल राजेंद्र राजपूत होत्या. तर, प्रमुख अतिथी म्हणून नाशिक येथील दगडूसिंग परमार, धुळे येथील किशोर बोरसे उपस्थित होते.

डॉ. गिरासे पुढे म्हणाले की, खरे पाहता निसर्गातील सभोवतालच्या सजीव व निर्जीव घटकांनी आपले पर्यावरण बनलेले आहे. यातील मनुष्य, प्राणी, पशुपक्षी, वनस्पती, जमीन, हवा, पाणी, जंगल या प्रत्येक घटकांचे एकमेकांशी अतूट नाते आहे. माणूस मात्र स्वार्थासाठी निसर्गसंपदेचा अतिवापर व पर्यावरण प्रदूषित करून सजीव सृष्टीच्या अस्तित्वाला नुकसान पोहोचवत आहे. वाढती लोकसंख्या व प्रगतीच्या नावाखाली होणारा औद्योगिक विकास, वस्ती विस्तारीकरण, रस्ते-महामार्गांची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर केली जाणारी वृक्षतोड व जंगलतोड, यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. आजपर्यंत पृथ्वीवरील सजीवांच्या ४,५०० पेक्षा जास्त सजाती नष्ट झाल्या असून सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पर्यावरण समृद्धीसाठी जनतेचे प्रबोधन करून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व संवर्धन करणे, पाणी अडवा पाणी जिरवा, निसर्गसंपदेचा व पाण्याचा योग्य वापर, पशुपक्ष्यांच्या अधिवास नष्ट न करणे गरजेचे आहे.

सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश वाघ, मच्छिंद्र भाळे, अशोक आहिरे, प्रवीण पाटील, रवींद्र आभाळे, पंकज पाटील, विकास चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Ecological balance is essential for the survival of living things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.