मालपूर परिसरात पावसाच्या भीतीने लवकर भुईमूग काढणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:37 IST2021-05-09T04:37:23+5:302021-05-09T04:37:23+5:30
मालपूरसह परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजेनंतर अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होऊन तयार भुईमूग पीक उत्पादक ...

मालपूर परिसरात पावसाच्या भीतीने लवकर भुईमूग काढणीला सुरुवात
मालपूरसह परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजेनंतर अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होऊन तयार भुईमूग पीक उत्पादक शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. या आधी रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावून नुकसान केले होते. यामुळे हातातोंडाशी आलेला घास पाण्यात जाऊन मातीत मिसळून सर्वच उत्पन्न वाया जाईल, तसेच पशुंचा चाराही मातीमोल होईल, या धास्तीनेच येथे आधुनिक यंत्राला पसंती दिली आहे.
भुईमूग हे पीक रब्बी व खरीप दोन्ही हंगामांत येथील शेतकरी घेतात. यातून मिळणाऱ्या चाऱ्याला मोठी मागणी असते, परंतु या यंत्रामुळे चारा काही अंशी वाया जातो. मात्र, यासाठी लागत असलेली मजुरी बघता, हे यंत्र फायद्याचे असल्याचे येथील शेतकरी सांगतात. भुईमूग काढणीसाठी मजुरी गगनाला भिडली असून, अर्धा पारगाची एका माणसाची मजुरी ३५० रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर एकराला ४० माणसे लागत असून, यामुळे मजुरी वजा करता, हातात काहीच शिल्लक राहत नसल्यामुळे या यंत्राला पसंती दिली असून, मात्र हे यंत्र अजून विकसित होणे गरजेचे आहे. मालपूर येथील आनंदराव खलाणे यांनी हे यंत्र चालू वर्षी गुजरात राज्यातील राजकोट येथून आणले असून, शेतकऱ्यांनी या यंत्राला पसंती दिली आहे. यामुळे वेळ व मजुरीचा खर्च वाचत असल्याचे शेतकरी बापू रामचंद्र पाटील यांनी सांगितले. भुईमुगाच्या शेंगा या जमिनीच्या खाली वाढीस लागत असल्यामुळे त्यांना मातीतून वेगळ्या करणे हे खूपच कष्टाचे काम असून, त्यात मे महिन्याचे ऊन अंगावर घ्यावे लागत असल्यामुळे अधिकच जोखीम वाढते.