आॅनलाइन लोकमतधुळे : हैद्राबादहून अहमदाबादकडे नेण्यात येणारा १७ लाखांचा गुटखा, पानमसाला व १२ लाखांचा कंटेनर असा एकूण २९ लाखांचा ऐवज धुळे तालुका पोलिसांनी पकडला. ही कारवाई पोलिसांनी २५ रोजी मध्यरात्रीनंतर पहाटे १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव-धुळे राष्टÑीय महामार्ग क्र.२११ वरील शिरूड चौफुलीजवळ केली. याप्रकरणी कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हैद्राबाद येथुन चाळीसगाव मार्गे अहमदाबादला कंटेनरमधून (क्र. केअे ०१-अेएफ २३९२) मधून गुटखा, पानमसाला नेला जात असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने धुळे-चाळीसगाव रोडवरील शिरूड चौफुलीजवळ नाकाबंदी केली. २५ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी संशयित कंटेनर अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी कंटेनरचा मागील दरवाजा उघडला असता, त्यात प्लॅस्टिक पोत्यांमध्ये पान मसाल्याचा अवैध गुटखा आढळून आला.पोलिसांनी ६१ पोत्यांमधून १६ लाख ४७ हजार रूपये किंमतीचे १३ हजार ४२० गुटख्याची पाकिटे, त्याचबरोबर सहा पोत्यांमधून ४८ हजार रूपये किंमतीचा पान मसाला व १२ लाख रूपये किंमतीचा कंटनेर असा एकूण २८ लाख ९५ हजार रूपयांचा माल जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, साक्रीचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस नाईक हेमंत बोरसे, कॉन्स्टेबल अमोल कापसे, सुरेश पावरा, राकेश शिरसाठ, सुमीत चव्हाण यांच्या पथकाने केली.याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कंटेनर चालक अब्दुल्लाह अबु कलाम (वय ३१, रा. रानीपूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतलेले आहे.
धुळ्यात पहाटे कंटेनरसह २९ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:48 IST