डंपरने दुचाकीला उडविले, पती ठार, पत्नी गंभीर जखमी; सांगवी गावाजवळील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: October 24, 2023 16:00 IST2023-10-24T15:59:57+5:302023-10-24T16:00:16+5:30
भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यात पती-पत्नी दोघांना गंभीर दुखापत झाली.

डंपरने दुचाकीला उडविले, पती ठार, पत्नी गंभीर जखमी; सांगवी गावाजवळील घटना
धुळे : भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यात पती-पत्नी दोघांना गंभीर दुखापत झाली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पतीचा मृत्यू झाला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता घडली होती. अपघातात उदेशकुमार वसंतराव सातव (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला. तर प्रीती उदेशकुमार सातव या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री सव्वासात वाजता गुन्हा दाखल झाला.
मयत उदेशकुमार सातव याचा भाऊ युगांत वसंतराव सातव (वय २६, रा. पोहर, ता. मुलताई, जि. बैतूल मध्य प्रदेश) यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, उदेशकुमार वसंतराव सातव (वय २८) आणि त्यांची पत्नी प्रीती सातव (वय १९) (दोघे रा. पोहर, ता. मुलताई, जि. बैतुल) हे दोघे शिरपूरकडून पोहरकडे दुचाकीने (एमपी ४८ झेडबी ०५६१) जात होते. सांगवी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला डंपरने (एमएच १८ बीझेड ०९१३) धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना उदेशकुमार सातव याचा मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रीती सातव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी डंपरचालक मोतीकुमार मधुराप्रसाद केवत (वय ३८, रा. बनसागर देवोलोंड, ता. बिहोरी, जि. शहाडोल. मध्य प्रदेश) याच्या विरोधात सोमवारी रात्री सव्वासात वाजता शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १८७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. चालकाला अटक करण्यात आली. घटनेचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मंगला पवार करीत आहेत.