धुळ्यात पिचकारी, रंग खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 18:06 IST2018-02-26T18:06:59+5:302018-02-26T18:06:59+5:30
चैतन्य : होळी, धूलिवंदन सणानिमित्त शहरातील मंडळे सज्ज

धुळ्यात पिचकारी, रंग खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : होळी, धूलिवंदन सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजरपेठेत विक्रेत्यांनी पिचकारी व रंग विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. या विक्रेत्यांकडे आतापासूनच खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. दरम्यान, हे सण उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यानुसार कार्यकर्त्यांनी आपआपल्या चौकांमध्ये जय्यत तयारी सुरू केली आहे.
होळी व धूलिवंदन सण धुळे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवत धुळे शहरातील गल्ली क्रमांक ६ मधील स्वतंत्र भांग्या मारूती मित्र मंडळ, वाडीभोकररोडवरील उत्तरमुखी मारूती मित्र मंडळ व अन्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जुन्या धुळ्यातील काही भागात सोमवारी पताका व चौक सुशोभिकरणाचे काम सुरू होते. तर धूलिवंदन सणाच्या दिवशी डिजेच्या तालात पाण्याच्या शॉवरखाली तरुणाईला नाचण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी जुन्या धुळ्यात शॉवर लावण्याचे काम सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.