वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली! कोंडवाडा अन् कर्मचारीही नाही : अनेकदा घडतात किरकोळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:16+5:302021-09-23T04:41:16+5:30
धुळे : शहरातील बाजारपेठ आणि त्यालगतच्या रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या ...

वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली! कोंडवाडा अन् कर्मचारीही नाही : अनेकदा घडतात किरकोळ अपघात
धुळे : शहरातील बाजारपेठ आणि त्यालगतच्या रस्त्यांवर मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या भागात टाकाऊ भाजीपाल्यामुळे गुरांना खाद्य उपलब्ध होत असल्याने त्यांचा सतत वावर असतो. या गंभीर प्रश्नाकडे पालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
धक्कादायक म्हणजे मोकाट जनावरांच्या बाबतीत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. धक्कादायक म्हणजे पालिकेकडे कोंडवाडा तर नाहीच परंतु कर्मचारी देखील नाही. अनेक वर्षांपासून पद रिक्त असल्याचे सांगण्यात आले. गुरांचा वावर वाढल्याने शहरवासीयांना वैताग आला आहे.
लहान मुलांना सांभाळा
बाजारपेठेत किंवा रस्त्यांवरच नव्हे तर रहिवासी वस्त्यांमध्ये देखील मोकाट जनावरांचा वावर आहे. कोरोनामुळे लहान मुलांच्या शाळा बंद असल्या तरी खासगी शिकवणी वर्ग मात्र शहराच्या विविध परिसरात सुरु आहेत. शिकवणीसाठी मुले पायी किंवा सायकलीने ये-जा करतात. या मुलांना मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांपासून देखील धोका आहे. त्यामुळे मुलांना एकटे सोडणे योग्य नाही. अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. पालकांनी मुलांना सांभाळण्याची गरज आहे.
मोकाट जनावरांचा वाली कोण?
धुळे शहरासह शहरालगतच्या महामार्गांवर फिरणारी ही मोकाट गुरे मुळात मोकाट नसल्याची माहिती समोर आली आहे. काही जनावरांचा अपवाद वगळता इतर सर्व जनावरे पाळलेली आहेत. परंतु संबंधित मालक त्यांना शहरात मोकाट सोडून देतात. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न मिटतो. ही जनावरे सायंकाळी पुन्हा आपल्या गोठ्यात परततात, असे जाणकार सांगतात. मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकले तर त्यांचे मालक आपोआपच समोर येतील. दंड आकारल्यावर मोकाट सोडणे बंद होईल.
वराह, श्वानांचाही शहरात सुळसुळाट
नियमानुसार वराहपालन बंदिस्त जागेत करायला परवानगी आहे. परंतु संबंधित व्यावसायिक सर्वच वराह मोकाट सोडून देतात. अचानक रस्त्यावर पळत सुटणारे वराह अपघातांचे कारण ठरतात. मोकाट श्वानांचाही त्रास वाढला आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार दररोज घडतात. अनेकदा अपघातही होतात. श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने ठेकेदार नेमला आहे. परंतु हा ठेकेदार नेमके काय काम करतो कळत नाही. कारण श्वानांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे.
वर्षभरात एकही कारवाई नाही
धुळे महानगरपालिकेकडे कोंडवाच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट गुरांचा विषय हाताळणारे पद देखील रिक्त आहे. त्यामुळे वर्षभरातच काय तर गेल्या काही वर्षात एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मोकाट गुरांची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
या रस्त्यांवर वाहने जपून चालवा
आग्रा रोड
पारोळा रोड
मनपा चाैक
साक्री रोड
लगतचे महामार्ग