खान्देश सुपुत्राच्या मास्कने संसद घेतेय 'श्वास'; मोदींनी केलं कौतुक, खासदार-अधिकाऱ्यांचीही दाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:28 PM2021-07-24T17:28:01+5:302021-07-24T17:30:13+5:30

Dr. Sandip Patil : कोरोनाच्या काळातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनला उपस्थित राहणारे मंत्री, खासदारांनी कानपूर आयआयटीमध्ये तयार झालेले एन-९५ आणि एन-९९ हे ‘श्वासा’ मास्क वापरत आहेत.

Dr. Sandip Patil supply swasa mask to MP in parliament, Modi appreciated; Patil belongs khandesh | खान्देश सुपुत्राच्या मास्कने संसद घेतेय 'श्वास'; मोदींनी केलं कौतुक, खासदार-अधिकाऱ्यांचीही दाद!

खान्देश सुपुत्राच्या मास्कने संसद घेतेय 'श्वास'; मोदींनी केलं कौतुक, खासदार-अधिकाऱ्यांचीही दाद!

googlenewsNext
ठळक मुद्देआयआयटी कानपूर व ई-स्पीन नॅनोटेक प्रा.लि. यांच्या माध्यमातून या मास्कची निर्मिती करण्यात आली.लोकसभा, राज्यसभेतील खासदार, अधिकारीवर्ग सध्या हाच मास्क वापरत आहेत.

-  अतुल जोशी

धुळे : खान्देश ही गुणवंतांची भूमी आहे. याच खान्देशच्या मातीत जन्मलेल्या व सध्या कानपूर (उत्तर प्रदेश) येथे वास्तव्यास असलेल्या उद्योजकाने तयार केलेला मास्क संसद भवनात पोहोचला आहे. लोकसभा, राज्यसभेतील खासदार, अधिकारीवर्ग सध्या हाच मास्क वापरत आहेत.

कोरोनाच्या काळातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. या अधिवेशनला उपस्थित राहणारे मंत्री, खासदारांनी कानपूर आयआयटीमध्ये तयार झालेले एन-९५ आणि एन-९९ हे ‘श्वासा’ मास्क वापरत आहेत.

आयआयटी कानपूर व ई-स्पीन नॅनोटेक प्रा.लि. यांच्या माध्यमातून या मास्कची निर्मिती करण्यात आली. डॉ. संदीप पाटील यांच्या कंपनीने तयार केलेल्या मास्कची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्तुती केलेली आहे.

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडूनच डॉ. पाटील यांच्या कंपनीला २० हजार मास्क पुरविण्याची ॲार्डर मिळाली होती. पाटील यांनी विशिष्ट पद्धतीने पॅक करून संसदेत हे मास्क पोहोचविले आहेत. अतिशय अल्पदरात ही सेवा दिलेली आहे. प्रत्येक मंत्री, खासदारांना प्रत्येकी २० मास्क दिले.

इतर मास्कपेक्षा वेगळा
ई-स्पीनचे संचालक डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, बाजारात उपलब्ध असलेल्या मास्कपेक्षा हे मास्क वेगळे आहेत. त्यांना ‘श्वासा’ हे नाव देण्यात आलेले आहे. या मास्कची फिल्टरेशन क्षमता अन्य मास्कपेक्षा वेगळी आहे. जिवाणू, विषाणूविरोधी गुणधर्माने युक्त अशा या मास्कची निर्मिती दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. महामारीच्या काळात या मास्कचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे.दरम्यान, डॉ. संदीप पाटील यांना या कामात नितीन चऱ्हाटे (जळगाव) व डॉ. सुनील ढोले (शेगाव) यांचीही मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विदेशातही निर्यात
डॉ. संदीप पाटील यांच्या कपंनीमार्फत दररोज ३० ते ४० हजार मास्क तयार केले जातात. आतापर्यंत एक करोड मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. केवळ भारतातच नाही तर विदेशात कॅनडा, युरोप, कोरिया, आदी विदेशातही या मास्कची निर्यात केली जात आहे.

डॉ. संदीप पाटील मूळचे पिंप्रीचे रहिवासी
डॉ. संदीप पाटील हे मूळचे शिंदखेडा तालुक्यातील पिंंप्री गावचे रहिवासी आहेत. एम.टेक. झाल्यानंतर ते पीएच.डी. करण्यासाठी २००६ मध्ये कानपूर आयआयटी याठिकाणी गेले. पीएच.डी. करीत असतानाच त्यांनी २०१० मध्ये ‘ई-स्पीन नॅनोटेक’ नावाने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कंपनी सुरू केली. आयआयटी कानपूरच्या सहकार्याने आकारास आलेल्या त्यांच्या कंपनीत हल्ली दर्जेदार मास्कची निर्मिती केली जात आहे.

आमचे मास्क यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वापरलेले आहेत. आता पंतप्रधान कार्यालयाकडूनच २० हजार मास्क पुरविण्याची सूचना होती. त्यानुसार ‘श्वासा’ हे मास्क दिले आहेत. संसदेत सर्व सदस्य आमचेच मास्क वापरत आहेत, ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे.
-डॉ. संदीप पाटील,
संचालक, ई-स्पीन नॅनोटेक, कानपूर

Web Title: Dr. Sandip Patil supply swasa mask to MP in parliament, Modi appreciated; Patil belongs khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.