दोंडाईचा बाजार समिती : गुरांच्या बाजारात १५ कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:19 IST2019-05-17T12:18:10+5:302019-05-17T12:19:43+5:30
दोंडाईचा बाजार समिती : १९ लाख ८७ हजार रुपयांचे समितीला मिळाले घसघशीत उत्पन्न

dhule
दोंडाईचा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व दुय्यम बाजार समितीत गाय, बैल यांच्यासह २८ हजार ४८२ प्राण्यांची खरेदी-विक्री झाली असून त्यात १५ कोटी ७४ लाख ७३ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली आहे. बाजार समितीस गेटपास, रजिस्टर फी, बाजार फी यातून १९ लाख ८७ हजार ३०१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे .
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती व बेटावद दुय्यम बाजार समितीत बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढी या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.
येथील गाय बाजार प्रसिद्ध आहे. म्हैस व गाय विक्रीसाठी राजस्थान, गुजरात आदी राज्यातील व्यापारी येथे निवासी आहेत. बाजार समितीत २०१८-१९ या आर्थिक वर्षात पाच हजार १३२ बैलांची आवक झाली असून एक हजार १४१ खरेदी -विक्री झाली. त्यात एक कोटी ६८ लाख ५५ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली. बाजार समितीत गायींची चार हजार ६२३ आवक झाली असून तीन हजार ८५४ गायींची खरेदी-विक्री झाली. त्यात आठ कोटी ३८ लाख ७०० रुपयांची उलाढाल झाली. म्हशींची आवक एक हजार २४३ झाली असून त्यात एक हजार म्हशींची खरेदी-विक्री झाली. त्यात दोन कोटी ९१ लाख ६० हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली.
बाजार समितीत सर्वाधिक खरेदी-विक्री होते शेळींची. यात शेळ्यांची २९ हजार ३६४ आवक झाली असून खरेदी-विक्री २२ हजार २१८ इतकी झाली आहे. त्यात दोन कोटी ६७ लाख आठ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली. बाजार समितीत ६३० मेंढ्यांची आवक झाली असून २२४ मेंढ्यांची खरेदी-विक्री झाली. त्यात दोन लाख १७ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली.
आर्थिक वर्षात ४० हजार ८७२ विविध प्राण्यांची आवक
बाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षात विविध प्राण्यांची ४० हजार ८७२ एवढी आवक झाली असून २८ हजार ४८२ गुरांची खरेदीविक्री झाली. त्यात १५ कोटी ७४ लाख ७३ हजार १०० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. बाजार समीतीला गेटपास फी, रजिस्टर फी, बाजार फी व सुपर्व्हिजन कास्ट फी असे ऐकूण १९ लाख ८७ हजार ३०१ रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.