रस्त्याच्या दुतर्फा सारख्या अंतरावर गटारीचे काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:54+5:302021-07-02T04:24:54+5:30
धुळे : साक्री तालुक्यातील दुसाने गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर गटारीचे काम करावे, अशी मागणी करीत दुसाने गावातील ...

रस्त्याच्या दुतर्फा सारख्या अंतरावर गटारीचे काम करा
धुळे : साक्री तालुक्यातील दुसाने गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर गटारीचे काम करावे, अशी मागणी करीत दुसाने गावातील छोट्या व्यावसायिकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना निवदेन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सावळदे-चिमठाणे-बळसाणे-दुसाने-मेहेरगाव राज्यमार्गाचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत दुसाने गावात बसस्टाॅप परिसरात ६०० मीटर लांबीच्या गटारीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या अंतरावर गटारीचे काम न करता, दोंडाईचाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पश्चिम दिशेला १३ मीटर अंतरावर गटारीचे काम करण्यासाठी मोजमाप केले आहे. त्यामुळे रस्त्याच्या या दिशेला लहान व्यवसाय करून पोट भरणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार व्यावसायिकांवर अन्याय होणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साक्री उपअभियंत्यांना विनंती केली असता त्यांनी दाद दिली नाही. नियमानुसार रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला सारखे मोजमाप करून गटारी करणे अपेक्षित असून हीच आमची मागणी आहे. परंतु बांधकाम विभागामार्फत चुकीच्या पद्धतीने गटारीचे काम केले जात आहे. त्यामुळे गटारीचे काम करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना बांधकाम विभागाला द्याव्यात. अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे.
यावेळी दुसाने येथील व्यावसायिक दिनेश बागुल, संजय खैरनार, दगडू दहिते, हुसैन मन्यार, दिलीप पवार, विजय खैरनार, नामदेव वाघ, शरद सोनवणे, पंडित वाघ, रवींद्र सोमवंशी, विजय सोमवंशी, सुभाष बागुल, भूषण महाले, शांताराम महाले, महेंद्र सूर्यवंशी, मुराद खाटीक, रवींद्र खैरनार, जितेंद्र शिंदे, विकास खैरनार, रावसाहेब शिंदे, दगडू खैरनार आदी उपस्थित होते.