ठरावीक प्रभागातच विकासकामांना प्राधान्य दिल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:54+5:302021-03-28T04:33:54+5:30
शुक्रवारी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत झालेल्या नाराजी नाट्यानंतर नगरसेवक शीतल नवले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विविध ...

ठरावीक प्रभागातच विकासकामांना प्राधान्य दिल्याने नाराजी
शुक्रवारी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत झालेल्या नाराजी नाट्यानंतर नगरसेवक शीतल नवले यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे देत आपली भूमिका मांडली. त्यांच्याशी झालेला संवाद प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असा -
प्रश्न - शहरात दोन वर्षांत विकासकामे झालेली नाहीत का?
उत्तर : महानगरात १९ प्रभाग आहेत. असे असताना महानगरातील ठरावीकच दोन प्रभागांमध्ये विकासकामे केली जातात. त्यामुळे अन्य प्रभागांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मिल परिसर व अल्पसंख्याक प्रभागात मोठ्या प्रमाणात श्रमजीवी व कष्टकरी नागरिक राहतात. त्यांना आजही मोठ्या प्रमाणात मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या मार्गी लागावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही.
महापौर निवडीला अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर विरोध का?
उत्तर : महापाैरपदाला माझा मुळीच विराेध नाही. माझे म्हणणे एवढेच आहे. की नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, अर्थंसंकल्पात आम्ही सुचविलेली कामे आली पाहिजे. मात्र तसे होत नाही. आम्ही सांगितलेल्या कामांचा समावेश होत नाही. त्यामुळे इतिवृत्ताचे अवलोकन केले जावे. इतिवृत्तात प्रत्येक सदस्यांचे म्हणणे लिहिले जावे, अशी अपेक्षा आहे. इतिवृत्त मिळण्यासाठी लेखी स्वरूपात माहिती मागविली आहे. यापुढील सभेेत वास्तववादी बजेट सादर झाले नाही तर आंदोलनाला बसेन.
भाजपकडून तुम्हाला पद देण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी भाजपात आलो आहे. पक्षाकडून पद मिळेल अशी अपेक्षाही कधी केलेली नाही आणि पदासाठी राजकारणातही आलेलो नाही. आमच्या परिवारात यापूर्वी महापाैरपद मिळालेले आहे. महापाैर होऊ शकलो नाही, पण महापाैरांचा मुलगा असल्याची तरी माझी ओळख आहे. पक्षाकडून पद मिळाले किंवा नाही हा नशिबाचा भाग आहे. पक्षाला वाटत असेल तर विचार करावा.
खडसेंना भेटल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटल्याची केवळ अफवा आहे. माध्यम किंवा समाजात चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. माझे वडील मोहन नवले राष्ट्रवादीचे महापाैर असतानादेखील मी कधी राजकारणात आलो नाही किंवा तेव्हाही राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतलेले नव्हते. तरी कुणीही गैरसमज करून घेऊ नये.
आगामी महापाेैरदेखील भाजपचा
जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर धुळ्यातही सत्तांतर होईल असे मला तरी नाही वाटत. भाजपचे सर्व नगरसेवक एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आगामी महापाैर हादेखील भाजपचाच होईल यात शंका नाही.