चराईसाठीच्या वनजमिनीचा वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:18+5:302021-07-08T04:24:18+5:30

धुळे : चराईसाठीच्या वनजमिनीचा वाद पेटला असून मेंढपाळांनी महिला वनरक्षकासह वनकर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना बुरझड, ता. धुळे शिवारात मंगळवारी ...

The dispute over forest land for grazing erupted | चराईसाठीच्या वनजमिनीचा वाद पेटला

चराईसाठीच्या वनजमिनीचा वाद पेटला

धुळे : चराईसाठीच्या वनजमिनीचा वाद पेटला असून मेंढपाळांनी महिला वनरक्षकासह वनकर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना बुरझड, ता. धुळे शिवारात मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमाराला घडली. याप्रकरणी बुरझडच्या ३ मेंढपाळांवर मारहाणीचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुरझड परिसरात वनक्षेत्रामध्ये मेंढपाळांचा त्रास वाढला असून ते ऐकत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गस्त घालण्याचे आदेश व्हाॅट्‌सॲप संदेशाच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे यांनी दिले. त्यानुसार डांगुर्णे वनरक्षक वैशाली व्ही. पाटील, कोमल साहेबराव जाधव आणि वनकर्मचाऱ्यांचे पथक दुपारी सामूहिक गस्तीवर असताना संरक्षित क्षेत्रामध्ये मेंढ्या चरताना दिसल्या. त्यामुळे रोपांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनाला आले. त्यामुळे लहू धुडा ठेलारी याला मेंढ्या बाहेर काढण्याचे सांगण्यात आले. परंतु मेंढ्या चारण्यासाठी कुठेही जागा नाही, आम्ही येथेच मेंढ्या चारणार, अशी अरेरावीची भाषा करण्यात आली. वनकर्मचारी समजावण्यास गेले असता लहानू सखाराम ठेलारी याने काठीच्या सहायाने तर इतरांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, निकुंभे गावातील संरक्षण वनमजूर यांनी मध्यस्थी करून वनकर्मचाऱ्यांची सुटका केली. त्यानंतर ठेलारी समाजाने वनपाल यांना मारहाण करण्याची धमकी दिली. या झटापटीत लहू ठेलारी हा खाली पडून जखमी झाला. या घटनेची माहिती शिंदखेड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे यांना त्वरित दिली.

दरम्यान, शासकीय कर्तव्य पार पाडत असताना ठेलारी मेंढपाळांनी मारहाण तसेच शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद वनकर्मचारी कोमल साहेबराव जाधव (२७, रा. टेलिफोन काॅलनी, गोंदूर रोड, धुळे) यांनी दिली. त्यानुसार लहू धुडा ठेलारी, लहानु सखाराम ठेलारी, हिरामण सीताराम ठेलारी (तिघे रा. बुरझड, ता. धुळे) यांच्याविरुद्ध सोनगीर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक निकाळजे करीत आहेत.

Web Title: The dispute over forest land for grazing erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.