धुळे बस स्थानकाला खड्ड्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST2021-07-02T04:24:56+5:302021-07-02T04:24:56+5:30
धुळे : येथील मध्यवर्ती बस स्थानकाला खड्ड्यांनी विळखा घातला आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने बसचालकांसह प्रवाशांचेही हाल होत ...

धुळे बस स्थानकाला खड्ड्यांचा विळखा
धुळे : येथील मध्यवर्ती बस स्थानकाला खड्ड्यांनी विळखा घातला आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने बसचालकांसह प्रवाशांचेही हाल होत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाने त्वरित खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
धुळे शहरातील बस स्थानक आवारात चाैफेर खड्डेच खड्डे पडले आहेत. हे खड्डे बोटावर मोजण्याइतके नसून, प्रत्येक पाच फुटांवर एक खड्डा सापडावा अशी दयनीय परिस्थिती आहे. वर्षानुवर्षे खड्ड्यांची समस्या कायम आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी मुरुम टाकून खड्डे बुजविले जातात. परंतु, गेल्यावर्षी कोरोनामुळे बसेस बंद असल्याने खड्ड्यांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला नाही. परंतु, यावर्षी वाहतूक सुरू झाल्याने पावसाळ्याच्या आधी डांबरीकरण करणे किंवा तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून खड्डे बुजविणे आवश्यक होते. परंतु, एसटी महामंडळाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्याच्या आधी रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याच्या सूचना शासनाने सर्व विभागांना दिल्या होत्या. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचा स्वतंत्र बांधकाम विभाग असताना देखील बस स्थानकात आजही खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे बसचालकांना बस चालविणे अडचणीचे ठरत आहे. तसेच प्रवाशांना पायी चालणे देखील त्रासदायक झाले आहे. बसची चाके खड्ड्यात गेल्यावर साचलले पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते आणि त्यांचे कपडे खराब होतात. लहान बालके खड्ड्यांमध्ये पडतात. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.