जिव्हाळा तर्फे ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:05+5:302021-09-25T04:39:05+5:30
धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी ...

जिव्हाळा तर्फे ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ उपक्रम
धुळे : तृतीयपंथी हा घटक आजही दुर्लक्षित असून तृतीयपंथीयांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांनादेखील रोजगार, शिक्षण व संरक्षणाची उपलब्धी निर्माण व्हावी यासाठी तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथीयांचे हक्क, संरक्षण व कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या राज्य अशासकीय सदस्या वर्षा विद्या विलास यांनी केले.
जिव्हाळा सामाजिक संस्थेच्या वतीने धुळे येथील मालेगाव रोड वरील बर्फ कारखान्याच्या मागील परिसरातील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी (काळूबाई) मंदिरातील तृतीयपंथीयांसोबत संपन्न झालेल्या ‘संवाद तृतीयपंथीयांशी’ या उपक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिव्हाळा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रार निवारण समितीचे आमंत्रित सदस्य ॲड. विनोद बोरसे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या उपक्रमाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मुंबई येथील निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. डाॅ. प्रभा तिरमिरे यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांकडेसुद्धा सामान्य माणसाइतकीच बुद्धिमत्ता, कौशल्य व माणुसकी असते. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रुती क्षीरसागर यांनीदेखील तृतीयपंथीयांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वतीनंदगिरी ऊर्फ पार्वती परशुराम जोगी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला संदल जोगी, स्वरा जोगी, विशाखा जोगी, जानवी जोगी, अंकिता जोगी आदी तृतीयपंथी उपस्थित होते.