धुळेकर हरवितात दिवसाला ४ मोबाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:37 IST2021-02-11T04:37:57+5:302021-02-11T04:37:57+5:30
धुळे : माेबाइल लंपास होण्याचे प्रमाण कमी अधिक होत असताना जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनेतदेखील मोबाइल लांबविल्याचा प्रकार ...

धुळेकर हरवितात दिवसाला ४ मोबाइल
धुळे : माेबाइल लंपास होण्याचे प्रमाण कमी अधिक होत असताना जबरी चोरी आणि घरफोडीच्या घटनेतदेखील मोबाइल लांबविल्याचा प्रकार समोर आलेला आहे. घटनेनंतर प्रत्येकाची नोंद होतेच असे नाही. पण, पोलिसात नोंद झाल्यानंतर साधारणपणे ३५ ते ४० टक्के प्रमाण हे मोबाइल संबंधिताना शोधून देण्याचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तुंप्रमाणे आता मोबाइल ही चैनीची नसून गरजेची बाब झाली आहे. संवादाचे प्रमुख माध्यम म्हणून त्याकडे पाहण्यात येते. गर्दीच्या ठिकाणी मोबाइल लांबविण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याशिवाय जबरी चाेरी आणि घरफोडीच्या माध्यमातूनदेखील मोबाइल लांबविण्याचे प्रमाण घडलेले आहे, हे नाकारुन चालणार नाही. पण, असे असलेतरी पोलिसात नोंद झाल्यानंतर त्याचा तपास ऑनलाइन पद्धतीने केला जातो. ३५ ते ४० टक्के प्रमाण हे माेबाइल शोधण्याचे आहे.
गर्दीच्या ठिकाणी मोबाइलची चोरी
शहरातील आग्रा रोड, पाचकंदीलसह अन्य गर्दीची ठिकाणे चोरट्यानी आपल्या नजरेसमोर ठेवलेली असल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे. याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी नेहमीपेक्षा अधिकची गर्दी राहते. शिवाय लग्नसराई असेल तर या मार्गावर पायी चालणे देखील मुश्कील होत असते. शिवाय एकांत ठिकाणी देखील मोबाइल लांबविल्याचा प्रकार वेळोवेळी घडत असतो. चोरट्यांनी याकडे लक्ष केंद्रित केल्याचे चित्र प्रकर्षाने समोर येत आहे. ग्रामीण भागातही अशीच काहीसी स्थिती पहावयास मिळत आहे.
३५ ते ४० टक्के मोबाइल शोधण्याचे प्रमाण
वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळेस नागरिकांचे मोबाइल लंपास होण्याचे प्रमाण समोर आले आहे. त्यात मोबाइल हरविण्यासोबतच घरात चोरी झाल्यानंतर, हातातून माेबाइल हिसकावून घेतल्यानंतर याप्रमाणे त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात सुरुवात होत असते. वर्षभरात मोबाइल चोरीच्या प्रमाणातील तुलनेत ३५ ते ४० टक्केे लांबविलेले मोबाइल पुन्हा संबंधितांकडे सुपुर्द करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पोलीस ठाण्यात देखील तशी नोंद घेण्यात येत असते.
नागरिकांनी आपल्या वस्तू सुरक्षितपणे सांभाळणे गरजेचे आहे. सद्याच्या काळात मोबाइल ही गरजेची बाब झाली असून नेमके त्याचकडे अनेकांकडून दुर्लक्ष केले जाते. ही बाब योग्य नाही. आपल्या वस्तू आणि त्यातल्या त्यात मोबाइल फोन हा नीट सांभाळणे आवश्यक असताना नेमके त्याचकडे दुर्लक्ष केले जाते. पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलीस तपास करतातच. पण, आपला मोबाइल आपण नीट सांभाळला तर त्याची चोरी होऊ शकत नाही. प्रत्येकाने नीटपणे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक, धुळे