धुळ्यात तीक्ष्ण हत्याराने वार, एकाची निर्घुण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 20:33 IST2021-04-02T20:33:14+5:302021-04-02T20:33:43+5:30
जखमी अवस्थेत घर गाठण्याचा प्रयत्न अयशस्वी, दोन संशयित ताब्यात

धुळ्यात तीक्ष्ण हत्याराने वार, एकाची निर्घुण हत्या
धुळे - शहरात एका ४३ वर्षीय इसमावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशाल माणिक गरुड (४३, रा. आंबेडकर चौक, अमरनगर, धुळे) असे मयताचे नाव आहे. दरम्यान विशाल गरूड हे पत्रकार पुरूषोत्तम गरूड यांचे बंधू होत.
मिळालेल्या माहितीनुसार विशाल गरूड हे दुचाकीवरून रात्रीच्यावेळी महापालिकेच्या जुन्या इमारतीकडून तहसील कार्यालयाकडे येत असतांना अज्ञाताने त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. ते काँग्रेस भवनासमोर गंभीर अवस्थेत पडलेले होते. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच उपअधीक्षक दिनकर पिंगळे, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, संतोष तिगोटे व पोलीस कर्मचारी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विशाल गरूड यास हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पहाटे पावणे दोन वाजता त्यांना मयत घोषीत केले.
पोलीस ठाण्यात गर्दी
विशाल गरुड यांचा कोणीतरी खून केल्याची बातमी सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्याच्या नातेवाईकांसह हितचिंतकांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मारेकऱ्यांना जो पर्यंत अटक करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ शहर पोलीस ठाण्याच्या आवारात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मारेकऱ्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन पोलिसांकडून मिळाल्याने वातावरण निवळले.
खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी शुक्रवारी योगेश पंडीत पगारे यांच्या फियार्दीवरुन शहर पोलीस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे तपास करीत आहे.
घटनास्थळाचे नमुने
विशाल गरुड हे काँग्रेस भवनासमोर ज्या ठिकाणी आढळून आले त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने रक्ताचे नमूने संकलित केले. ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
भेट राहिली अपूर्ण
मयत विशाल याचे पत्नीशी घरगुती वाद असल्यामुळे ते एकत्र राहत नव्हते. गेल्या तीन वषार्पासून अमरनगरातील बहिण आशाबाई याच्याकडे विशाल हे राहत होते. विशाल यांची पत्नी निलीमा व तीन मुले हे साक्री रोडवरील अजिंक्यतारा सोसायटी येथे राहतात. त्यामुळे विशाल गरुड हे आवठवड्यातून दर शनिवारी त्यांच्या घरी जात होते. परंतु शुक्रवारीच विशाल यांचा मृत्यू झाल्याने त्यांची मुलांशी होणारी शनिवारची भेट अपूर्णच राहिली.
भाच्याशी झाला संवाद
विशाल गरुड हे दररोज रात्री साडेदहा वाजेपर्यंत घरी येत असत. गुरुवारी सकाळी बाहेर जावून दुपारी जेवायला आले होते. सायंकाळी ५ वाजता ते घरातून निघाले. शुक्रवारी पहाटे सव्वा बारा वाजेपर्यंत ते घरी आले नव्हते. त्यामुळे बहिण आशाबाई यांनी मामाला फोन लावण्याचे मुलाला सांगितले. भाच्याने विशाल यांना पहाटे साडेबारा वाजता फोन लावला तेव्हा घरी येण्याचे सांगितले असता १० मिनीटात घरी पोहचतो असे त्याने सांगितले. मात्र त्यांचा हा संवाद अखेरचा ठरला.