रुग्णसेवा नाकारणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा धुळे मनपा आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 12:39 IST2020-03-29T12:39:39+5:302020-03-29T12:39:56+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे खाजगी डॉक्टरांची घेतली बैठक

रुग्णसेवा नाकारणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा धुळे मनपा आयुक्तांचा इशारा
आॅनलाइन लोकमत
धुळे : कोरोनाच्या भीतीने शहरातील बहुसंख्य खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहे. संचारबंदीत नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी दवाखाने सुरू असणे गरजेचे आहे. रुग्णसेवा नाकारणाºया रुग्णालयाची मान्यता रद्द करून सदरील डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाईल असा निर्णय आयुक्त अजीज शेख यांनी बैठकीत घेतला.
महापालिका शुक्रवारी आयुक्त शेख यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या बैठक झाली. यावेळी उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, तुषार नेरकर, विनायक कोते, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, मनपा दवाखान्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्यात आयुक्तांनी सांगितले की, प्रत्येकाने आपापल्या भागानुसार शहरांमध्ये विदेशातून तसेच बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींच्या माहितीसाठी शहरामध्ये सर्वेक्षण करावे. तसेच तसेच मनपा दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफ साठी आवश्यक असणारे सॅनिटायझर, साबण, मास्क हे साहित्य आज उपलब्ध करून देण्यात आले.
सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपाययोजनेसंदर्भात कृती आराखडा तयार करावा आणि त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत आयुक्तांनी आरोग्य विभागातील अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या दूर करण्यासाठी सुचना केल्या. बैठकीस उपायुक्त संजय गिरी, आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांचे आवाहन
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. प्रशासकीय यंत्रणा या कार्यात व्यस्त असताना खाजगी दवाखान्यातील ओपीडी बंद असल्यास त्याचा दबाव शासकीय आरोग्य यंत्रणेवर पडतो. तेव्हा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ओपीडी सुरू ठेऊन रुग्णांवर उपचार कराव, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनीसुद्ध एका प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.