Dhule: अहो आश्चर्यम, रेल्वेची तिकीटे संपली, शेकडो प्रवाशांनी केला मोफत प्रवास, भोरस स्थानकावरील प्रकार

By सचिन देव | Published: February 27, 2024 04:20 PM2024-02-27T16:20:07+5:302024-02-27T16:20:59+5:30

Indian Railway News: प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करावा, अन्यथा टीटीईकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येते. मात्र, मंगळवारी चाळीसगावहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मेमू गाडीचा भोरस स्टेशनवरील तिकीटांचा कोटांच संपल्याचा प्रकार घडला.

Dhule: Hey Suryaram, train tickets sold out, hundreds of passengers travel for free, Bhoras station type | Dhule: अहो आश्चर्यम, रेल्वेची तिकीटे संपली, शेकडो प्रवाशांनी केला मोफत प्रवास, भोरस स्थानकावरील प्रकार

Dhule: अहो आश्चर्यम, रेल्वेची तिकीटे संपली, शेकडो प्रवाशांनी केला मोफत प्रवास, भोरस स्थानकावरील प्रकार

- सचिन देव 
धुळे -  प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करावा, अन्यथा टीटीईकडून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार सांगण्यात येते. मात्र, मंगळवारी चाळीसगावहुन धुळ्याकडे जाणाऱ्या मेमू गाडीचा भोरस स्टेशनवरील तिकीटांचा कोटांच संपल्याचा प्रकार घडला. यामुळे २०० हुन अधिक प्रवाशांनी गार्डच्या संमतीनेच भोरस ते बोरविहीर पर्यंत मोफत प्रवास केला. काही प्रवाशांनी टीटीई पकडेल, या भीतीने तिकीट देण्याची मागणी केली. मात्र, तिकीटचं शिल्लक नाही तर कुठून देणार, असे म्हणत हतबलता दाखवून या गार्डने प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली.

भुसावळ रेल्वे विभागातील चाळीसगाव ते धुळे दरम्यान दिवसातुन चारवेळा मेमू गाडी धावते. चाळीसगाहुन बसणाऱ्या प्रवाशांना या गाडीचे तिकीट चाळीसगाव स्टेशनवरच मिळते. मात्र, या गाडीच्या मार्गावर थांबा असलेल्या `भोरस बुद्रूक ` या रेल्वे स्टेशनवर तिकीट खिडकी नसल्यामुळे, या गाडीच्या गार्डमार्फत प्रवाशांना तिकीटे दिली जातात. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे ही गाडी चाळीसगाव स्टेशनहुन निघून, भोरस बुद्रूक स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांनी तिकीटे काढण्यासाठी गार्डकडे एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे कधी नव्हे ३०० ते ४०० प्रवाशांनी या गाडीच्या मागील बाजूस असलेल्या गार्डच्या डब्याजवळ तिकीटे घेण्यासाठी रांग लावली होती. मात्र, यातील केवळ ५० ते ६० प्रवाशांना तिकीटे मिळाली. तर उर्वरित प्रवाशांना गार्डने तिकीट संपल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. यावेळी प्रवाशांनी मगआम्ही प्रवास करायचा, टीटीईने पकडले तर आम्ही काय करायचे, अशा प्रश्नांचा भडिमार करून, गार्डला तिकीटे देण्याची मागणी केली. मात्र, गार्डने तिकीटचं देण्यासाठी नाही, तर कुठून देणार, असे म्हणत प्रवाशांना तिकीट नसले तरी प्रवास करण्याचे सांगितले.

साहेब टीसीने पकडले तर दंड तुम्ही भरा..
भोरस स्टेशनवर तिकीटे संपल्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या २०० ते २५० प्रवाशांनी एकच गोंधळ केला. या वेळी काही प्रवाशांनी साहेब, गाडीत टीसीने पकडल्यावर आम्ही काय करू, दंड तुम्ही भरणार का, आम्ही टिसीला तुमचेच नाव सांगू, असे म्हणत गार्डला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर काही प्रवाशांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला.

टीसीने विनातिकीट कारवाई करू नये, म्हणून मी तिकीट काढण्यासाठी गार्डच्या डब्याजवळ गेलो. मात्र, त्यांनी तिकीट संपल्याचे सांगितल्यावर मला आश्चर्य वाटले. मग त्यांनींच प्रवास करू शकता, असे सांगितल्यावर मी बोरविहीरला जात आहे.
- देवा शिंदे, प्रवासी 

या मेमू गाडीला प्रत्येक स्टेशनवरून सरासरी बसणाऱ्या प्रवाशांच्या संख्येनुसार तिकीटे दिलेली असतात. मात्र, मंगळवारी जास्त प्रवासी आल्यामुळे ही तिकीटे संपली. त्यामुळे गार्ड ऐनवेळी कुठून तिकीटे आणणार. यापुढे जादा तिकीटे देण्याबाबत चाळीसगाव स्टेशन प्रशासनाला कळविले जाईल.
संतोष जाधव, स्टेशन प्रबंधक, धुळे रेल्वे स्टेशन.

तर रेल्वेचेही नुकसान..
या मेमू गाडीचे भोरस ते बोरविहीर १५ रूपये तिकीट आहे. मात्र, २०० हुन अधिक प्रवाशांना तिकीटचं मिळाले नसल्यामुळे, रेल्वेचे तिकीटांपासून मिळणारे आर्थिक उत्पन्नही बुडून आर्थिक नुकसान झाले. जर याच प्रवाशांवर टीटीईने दंडात्मक कारवाई केली असती, तर यातुन रेल्वेचा मोठा महसुल मिळाला असता. मात्र, गाडीत सुदैवानी टीटीई नसल्यामुळे या प्रवाशांवर कारवाई झाली नाही.

Web Title: Dhule: Hey Suryaram, train tickets sold out, hundreds of passengers travel for free, Bhoras station type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.