धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षांच्या मुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:12 IST2018-01-17T11:41:05+5:302018-01-17T12:12:03+5:30
राहत्या घरी घेतला गळफास : कारण अद्याप गुलदस्त्यात

धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षांच्या मुलाची आत्महत्या
धुळे : शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या ११ वी विज्ञान शाखेच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. निखिल सुनील पावरा असे मृताचे नाव असून तो राष्टवादी महिला आघाडीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा मुलगा आहे. १९ जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
शहरातील देवपूर भागात वाडीभोकर रोडवर असलेल्या अभियंता नगरात ज्योती पावरा यांचे निवासस्थान (प्लॉट नं.२४) आहे. त्या गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील वैजापूर (तालुका चोपडा) या त्यांच्या माहेरी गेल्या आहेत. बुधवारी (17 जानेवारी) सकाळी निखिलने गळफास घेतल्याचे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याचे वडील सुनील पावरा यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यास खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. निखिल याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. कारणाचा तपास केला जात असल्याचे देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी सांगितले.