धुळे जिल्ह्यात संततधार, मोठ्या विसर्गामुळे पांझरा, बुराई, अनेर व अरुणावती नद्यांना पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:55 IST2019-08-09T12:55:06+5:302019-08-09T12:55:36+5:30

शिरपूर तालुक्यात मातीचे धरण फुटले, शिंदखेड्यात शाळांना सुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला, शिरपूर, कासाऱ्यात दुकानांमध्ये पाणी

Dhule district floods, rivers, floods, Panjara, Burai, Aner and Arunavati rivers | धुळे जिल्ह्यात संततधार, मोठ्या विसर्गामुळे पांझरा, बुराई, अनेर व अरुणावती नद्यांना पूर

धुळे जिल्ह्यात संततधार, मोठ्या विसर्गामुळे पांझरा, बुराई, अनेर व अरुणावती नद्यांना पूर


धुळे : जिल्ह्यात संततधार सुरूच असून रात्री जिल्ह्यात बहुतांश मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. शिरपूर तालुक्यात फत्तेपूर फॉरेस्ट येथील मातीचे धरण (बंधारा) फुटल्याने पाणी वाहून जात आहे. अक्कलपाडा धरणाचे सकाळी सात दरवाजे उघडल्याने पांझरा नदीपात्रात ५५ हजार क्युसेस, अनेर धरणातून ४० हजार क्युसेस तर बुराई धरणातून ९ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत असून या नद्यांना मोठे पूर आले आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुराई नदीला कित्येक वर्षांनंतर आलेल्या पुरामुळे शिंदखेडा तालुक्यात शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. पांझरा नदीच्या पुरामुळे आल्याने साक्री तालुक्यातील कासारे येथे बाजारपेठेसह दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. कासारे येथे आतापर्यंतच सर्वात मोठा पूर आल्याचे सांगितले जात आहे. साक्री तालुक्यातील फोफादे गावाचा बुराई नदीच्या पुरामुळे तालुक्याशी संपर्क तुटला आहे. अनेर व अरुणावती नद्यांना पूर आल्याने शिरपूर शहरात हाहाकार उडाला आहे. दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिरपूर पॅटर्नने बांधलेले सर्व बंधारे ‘ओव्हरफ्लो’ झाले असून अनेर धरणातून ४० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शिंदखेडा तालुक्यातील अमरावती धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भरल्यानंतर त्यातूनही विसर्ग केला जाणार आहे.
धुळे तालुक्यातील नेर येथे गुरूवारी पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. शुक्रवारी पूरस्थिती कायम असल्याने काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत असून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथे पोहचले आहेत. नद्यांच्या विसर्गांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबण्याच्या सूचना दिल्या असून स्थितीचा आढावा घेतला जात आहे.

Web Title: Dhule district floods, rivers, floods, Panjara, Burai, Aner and Arunavati rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे