कोरोना लसीकरणात धुळे जिल्हा राज्यात पहिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST2021-02-06T05:08:04+5:302021-02-06T05:08:04+5:30
धुळे - कोरोना लसीकरणात जिल्ह्याची कामगिरी दमदार राहिली आहे. दैनंदिन लसीकरणाच्या यादीत यापूर्वी तीनदा जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला होता. ...

कोरोना लसीकरणात धुळे जिल्हा राज्यात पहिला
धुळे - कोरोना लसीकरणात जिल्ह्याची कामगिरी दमदार राहिली आहे. दैनंदिन लसीकरणाच्या यादीत यापूर्वी तीनदा जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला होता. आता राज्यात झालेल्या एकूण लसीकरणातही धुळ्याचा प्रथम क्रमांक आला आहे. मागील १२ दिवसात ५३ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. लसीकरणात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यांमध्ये धुळ्यानंतर भंडारा जिल्ह्याने दुसरा तर मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
जिल्ह्यात ११ हजार ४४१ आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. त्यापैकी ६ हजार ८८ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ५३.२१ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात दुसऱ्या स्थानी असलेल्या भंडारा जिल्ह्यात ५३.१५ टक्के तर तिसऱ्या स्थानी असलेल्या मुंबईत ४९.४३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
शेजारील नंदुरबार व जळगाव जिल्ह्याची पिछाडी -
कोरोना लसीकरणात धुळ्याने राज्यात बाजी मारली आहे. मात्र शेजारील नंदुरबार व जळगावची मात्र पिछाडी झाली आहे. लसीकरणाच्या यादीत १८व्या स्थानी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणासाठी १२ हजार ८४३ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ४ हजार ४८६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली असून आतापर्यंत ३४.९३ टक्के लसीकरण झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यात ३०.६२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जळगावात २५ हजार ४३ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ७ हजार ६६८ कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.
कोरोनामुक्त रुग्णांमध्ये चौथा क्रमांक -
कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये धुळ्याने चौथा क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९७.२४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. प्रथम स्थानी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ९७.९८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
सामूहिक यश -
कोरोना लसीकरणात सुरुवातीपासूनच जिल्हा आघाडीवर राहिला आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व आरोग्य कर्मचारी यांचे हे यश आहे. कोरोना लस घेण्याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही भीती नाही. पुढील टप्प्यातही जास्तीत जास्त लसीकरणासाठी प्रयत्नशील राहू.
डॉ.संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी