धुळे : डेंग्यू व मलेरिया दिवस : लक्षणांनुरूप होतो उपचार, आज रॅलीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 21:00 IST2019-05-16T20:59:01+5:302019-05-16T21:00:44+5:30
स्वत:ची काळजी घेणे हेच डेंग्यूवरील औषध!

dhule
धुळे : जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षात मलेरियाच्या संख्येतघट झाली असली तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे़ डेंग्यूवर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे करण्यात आले आहे़
राष्ट्रीय डेंग्यू दिन १६ मे रोजी साजरा केला जातो़ त्यानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय व मनपातर्फे विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाणार आहे़ जिल्ह्यात कारखाने, बांधकामे, सिंचन प्रकल्प, पाणीटंचाई व वाढते नागरीकरण या कारणांमुळे डेंग्यू रूग्णसंख्येत वाढ होत आहे़ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे़
डेंग्यूवर औषधोपचार नाही!
डेंग्यू हा एडिस डासामुळे होत असून या आजारावर कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाही़ त्यामुळे केवळ लक्षणांनुसार रूग्णांवर औषधोपचार केले जातात़ शिवाय डेंग्यू आहे किंवा नाही हे एलायझा या चाचणीवरूनच स्पष्ट होते़ मात्र खासगी रूग्णालये प्राथमिक चाचणीवरूनच डेंग्यूचे निदान करतात़
खाजगी दवाखान्यात डेंग्यूच्या चाचणीसाठी ६०० रूपयांपेक्षा अधिक शुल्क आकारू नये, असे आदेश असतांना खासगी रूग्णालयांकडून अधिक शुल्क आकारणी होते़ परंतु कुणीही तक्रार करीत नसल्याने कारवाई होत नाही़ त्याचप्रमाणे जिल्हा हिवताप कार्यालयाला कारवाईचे अधिकारही नाहीत़ मात्र आजार बळावू नयेत यासाठी नागरिकांनी आधीच आजारांपासून काळजी घेणे आवश्यक आहे़
जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यू व मलेरिया कमी प्रमाणात असला तरी शहरात मात्र हे आजार बळावत आहेत़ चालू वर्षात देखील शहरात एका रूग्णाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला आहे़ मनपा व हिवताप कार्यालय संयुक्तपणे जनजागृतीची मोहिम राबविते़
जून महिन्यात पावसाला सुरूवात होत असल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया यांसारख्या आजारांना कारणीभूत डासांसाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने नागरिकांनी पाण्याचे भांडे स्वच्छ ठेवावेत, कोरडा दिवस पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, ताप येताच रक्ताची तपासणी करावी, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे़
प्रभागनिहाय फवारणी व जनजागृृती
मान्सून काळात डासांची उत्पत्ती डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आमंत्रण देत असते. घराघरात साठविण्यात आलेल्या पाण्याबरोबरच बांधकामांची ठिकाणी डासांचे अड्डे बनू लागले आहेत. डासांची ही उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बांधकामे आणि झोपडपट्टया तसेच अन्य ठिकाणी अळीनाशक फवारणी करण्यात येत आहे़ डेंग्यूचा प्रसार करणारा एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती फेंगशुई, बांबू प्लँटस, मनीप्लँटससारखी शोभिवंत झाडे, घराजवळ ठेवलेल्या कुंड्या, एसी अशा ठिकाणी होत असल्याचे समोर आले आहे. सांडपाण्याच्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.