देवपूर पोलिसांच्या कारवाईत पिस्तुलसह काडतूस हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:26+5:302021-07-07T04:44:26+5:30
देवपूर पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अविनाश बन्सीलाल परदेशी याच्याकडून घेतलेले गावठी पिस्तुल विटाभट्टी परिसरात असल्याची माहिती मिळाली. याच ...

देवपूर पोलिसांच्या कारवाईत पिस्तुलसह काडतूस हस्तगत
देवपूर पोलिसांनी ट्रॅक्टर चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अविनाश बन्सीलाल परदेशी याच्याकडून घेतलेले गावठी पिस्तुल विटाभट्टी परिसरात असल्याची माहिती मिळाली. याच प्रकरणातील संशयित म्हणून हवा असलेला तरुण फरार असल्याने पोलिसांना कारवाई करता येत नव्हती. मात्र, याच माहितीच्या आधारे चंद्रकांत पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले.
संशयित असलेला राहुल वाल्मिक सूर्यवंशी (१९, रा. विटाभट्टी, दुर्गामाता मंदिराजवळ, देवपूर, धुळे) हा घरी आला असल्याची माहिती देवपूर पोलिसांना मिळाली. लागलीच देवपूर पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरी धाड टाकत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराची झाडाझडती घेतली. या झडतीत २५ हजार रुपये किमतीची गावठी पिस्तुल आणि ५०० रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सागर सूर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली. अविनाश परदेशी आणि राहुल सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून राहुल सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे.