साक्रीत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:09+5:302021-08-20T04:42:09+5:30
डॉ. भारती पवार या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त साक्री येथे आल्या असताना त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साक्री ...

साक्रीत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी
डॉ. भारती पवार या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त साक्री येथे आल्या असताना त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साक्री तालुका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असून, या तालुक्यातून व शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जातो. तसेच राज्य महामार्ग नाशिक, सटाणा व निजामपूर, नंदुरबारमार्गे गुजरात राज्यात जाणारा नव्याने अस्तित्वात असलेला राष्ट्रीय महामार्ग जातो. अशा सर्व वर्दळीच्या महामार्गावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू असते. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून साक्री शहरात ग्रामीण रुग्णालयात अपूर्ण वैद्यकीय सुविधा असल्यामुळे ते असून नसल्यासारखेच आहे.
याच ग्रामीण रुग्णालयाचे २०१२-१३ मध्ये १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले होते. त्यासाठी केंद्राच्या एनआरएचएम योजनेंतर्गत दाेन कोटींचा प्राथमिक निधीही मंजूर झाला होता. मात्र नेमके या जिल्हा उपकेंद्राचे घोडे जागेअभावी अडले. जागेचा शोध घेण्यात प्रशासकीय व राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या जागेत बहुमजली इमारतीचे बांधकाम करून रुग्णालय आहे त्याच ठिकाणी म्हणजेच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू करता येईल. महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णांना ५५ किमी दूर जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले जाते आणि मध्येच रुग्ण दगावण्याची घटना घडत असते. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे ट्रामा केयर सेंटर मंजूर झाले आहे. साक्रीपासून जिल्हा रुग्णालय व इतर खासगी सुविधा ५५ किमी अंतरावर आहे, तरी सदरचे ट्रामा केयर सेंटर साक्रीला मंजूर व्हावे.
साक्रीच्या रुग्णालयात टेलिमेडिसिन सुविधाही मंजूर करावी, जेणेकरून रुग्णांना त्याचा लाभ मिळेल. तसेच ग्रामीण रुग्णालयात प्रशिक्षित कर्मचारी व डॉक्टरांची वानवा असल्याने त्यांची पदेही तात्काळ भरली जावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य जनजाती क्षेत्र प्रमुख किशोर काळकर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, ॲड. गजेंद्र भोसले, विजय भोसले, बापू गिते, राकेश दहिते, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष हेमंत पवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य धर्मराज सोनवणे, सुहास चाळसे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो = साक्री येथे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना साक्री ग्रामीण रुग्णालयाची समस्या सोडविणेसाठी निवेदनप्रसंगी भाजपचे किशोर काळकर, सुरेश पाटील, शैलेंद्र आजगे, ॲड. गजेंद्र भोसले आदी.
190821\1447-img-20210819-wa0021.jpg
साक्री येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी निवेदन देतांना भाजपा चे किशोर काळकर, सुरेश पाटील, शैलेंद्र आजगे, आदी....